पंकजा मुंडे बाजी मारण्याची शक्यता! महाएक्झिट पोलचा पहिला निकाल

बीडमध्ये  भाजप उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध मविआचे बजरंग सोनावणे अशी लढत झाली. यात पंकजा मुंडे बाजी मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jun 1, 2024, 07:07 PM IST
पंकजा मुंडे बाजी मारण्याची शक्यता! महाएक्झिट पोलचा पहिला निकाल  title=

Exit Poll Lok Sabha Election 2024:   लोकसभा निवडणुकीच्या महाएक्झिट पोलच्या पहिल्या अंदाजात पंकजा मुंडे बाजी मारण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  मराठवाड्यातील हायहोल्टेज लोकसभा मतदारसंघ असलेल्या बीडच्या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. बीडमध्ये  भाजप उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध मविआचे बजरंग सोनावणे अशी लढत झाली. टीव्ही 9 -पोलस्ट्रॅट च्या एक्झिट पोलनुसार पंकजा मुंडे आघाडीवर दिसत आहेत. तर, बजरंग सोनावणे पिछाडीवर आहेत. 

 

बीडमध्ये प्रत्येक लोकसभा निवडणुकीत जातीय समीकरणं पाहायला मिळाली. तोच कित्ता या निवडणुकीतही गिरवला जात असल्याचं चित्र पहायला मिळाले.  कारण जातीय समीकरणांच्या आधारावरच इथली समीकरण ठरवली जाताय. मविआचे बजरंग सोनवणे आणि महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे जातीय राजकारण करत नसल्याचा दावा करत असले तरीदेखील त्यांच्या भाषणांमध्ये जातीचाच किनारा पहायला मिळाला. 

बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीत मराठा आणि ओबीसी असा छुपा संघर्ष 2009 पासून पाहायला मिळालाय. यंदा मात्र मराठा आंदोलनामुळे उघडउघडपणे मराठा-ओबीसी संघर्षाची चर्चा झाली. इथे गोपीनाथ मुंडेंपासून भाजप ओबीसी चेहरा देत आलीय तर राष्ट्रवादीकडून मराठा चेहरा देण्यात येतो.. यंदाही शेवटच्या क्षणी बजरंग सोनवणेंना उमेदवारी देत राष्ट्रवादीनं मराठा कार्ड खेळले. 

महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला मराठा मुस्लिम आणि दलित असा ठरवला. बीड जिल्ह्यात मराठा आणि मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळेच मराठा, मुस्लिमांसह दलित वर्गाला आपल्याकडे खेचण्यासाठी राष्ट्रवादीने  बजरंग सोनवणे यांना रिंगणात उतरवले.

सत्ताबदलानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचं मनोमिलन झालंय, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे बडे नेते एकाच मंचावर आल्याचे पाहायला मिळालं. यामध्ये खास करून मराठा नेते बहुसंख्येनं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या मंचावरती दिसले. 

(Desclaimer: 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या सर्व 7 टप्प्यांसाठी मतदान पूर्ण झाले असून 4 जून रोजी निकाल जाहीर होतील. त्याआधी, ZEE 24 Taas ने आपल्या दर्शकांसाठी एक मेगा एक्झिट पोल आणला आहे. या मेगा एक्झिट पोलमध्ये आम्ही देशातील अनेक मोठ्या एजन्सीचे एक्झिट पोल डेटा दाखवणार आहोत. दरम्यान झी 24 तास जी आकडेवारी दाखवेल ती वेगवेगळ्या एजन्सींच्या सर्वेक्षणातून मिळवलेली आकडेवारी आहे. ज्यासाठी 'झी 24 तास' जबाबदार नाही. हे आकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल नाहीत, फक्त एक्झिट पोल आहेत.)