औरंगाबाद : फेसबुकवर एका तरुणासोबत मैत्री करणं तरुणीला चांगलीच महागात पडली आहे.
फेसबुकच्या माध्यमातून मैत्री आणि मग भेट यामुळे तरुणी चांगलीच अडचणीत सापडली. भेटण्यासाठी आली नाहीस तर तरुणासोबतचे फोटो तरुणीच्या वडिलांना पाठवण्याची धमकी तो तरुणीला देत होता. त्यानंतर सोशल मीडियावर देखील फोटो टाकण्याची धमकी त्याने दिली.
दोन वर्षांपासून हा सगळा प्रकार सुरु होता. या प्रकाराला कंटाळून अखेर तरुणीने जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. महेश नाटेकर असं या तरुणाचं नाव आहे. 21 वर्षीय तरुणीची महेश सोबत फेसबूकवर मैत्री झाली. त्यानंतर दोघांमध्ये भेट झाली. त्या दरम्यान नाटेकरने तिच्यासोबत फोटो काढले.
काही दिवसानंतर भेटी कमी झाल्याने नाटेकरने तिला त्रास देणे सुरु केलं. हा सगळा प्रकार तरुणीने तिच्या भावाला देखील सांगितला. भावाने समजावून सांगितल्यानंतरही नाटेकर तिला त्रास देत होता. त्यामुळे या तरुणीने मोबाईल वापरणे देखील बंद केले. यानंतर तो तिच्या चुलत बहिणीच्या मोबाईलवर मॅसेज करून त्रास देत होता. अखेर तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.