डोंबिवली : बोगस आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवून, त्याद्वारे एका फायनान्स कंपनीकडून लोन घेत मोबाईल खरेदी केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. अशाप्रकारे बोगस आधारकार्ड तसंच पॅनकार्डद्वारे लोकांना फसवणाऱ्या टोळीचा छडा लावण्याची मागणी केली जात आहे.
डोंबिवलीमध्ये राहणारे रुपेश चव्हाण यांचं नाव, पत्ता वापरुन डुप्लिकेट आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवलं गेलं. त्याद्वारे लोनवर त्यानं मोबाईल खरेदी केला. या बनावटगिरीची काहीच कल्पना नसलेल्या रुपेश चव्हाण यांच्याकडे फायनान्स कंपनीनं लोनवर घेतलेल्या मोबाईलच्या थकीत हप्त्यांची चौकशी केली. तेव्हा रुपेश चव्हाण यांना घडला प्रकार लक्षात आला.
आधी हे प्रकरण फारसं मनावर न घेणाऱ्या पोलिसांनी नंतर या घटनेतचं गांभीर्य ओळखून कसून चौकशी केली आणि यातल्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या. यातल्या आरोपीला कल्याण न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली असून, त्यानं आणखी कोणाची अशा प्रकारे फसवणूक केली आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. तसंच यामागे मोठं रॅकेट असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.