'कर्जमाफीवर नाराजी जाहीर करण्यासाठी उद्या महाराष्ट्र बंद'

राज्य सरकारच्या कर्जमाफीवर शेतकरी नाराज आहेत. त्या नाराजीचा भाग म्हणून उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी बारामतीत सांगितलं.

Updated: Jan 7, 2020, 05:37 PM IST
'कर्जमाफीवर नाराजी जाहीर करण्यासाठी उद्या महाराष्ट्र बंद'

बारामती : राज्य सरकारच्या कर्जमाफीवर शेतकरी नाराज आहेत. त्या नाराजीचा भाग म्हणून उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी बारामतीत सांगितलं. कर्जमाफीबाबत ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या भावना सरकारनं समजून घ्याव्यात आणि दिलेलं आश्वासन पूर्ण करावं. 

अन्यथा ही कर्जमाफी फसवी ठरेल, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिली. शिवसेना देखील बंद मध्ये सहभागी होईल अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे सरकारकडून 2 लाखांचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करण्यात आली, प्रत्यक्षात मात्र अनुदानित पिककर्जाची मर्यादा ही 3 लाख रूपये आहे. 3 लाख रूपये पिककर्ज आणि त्यावरील व्याज तसेच इतर शेतीपूरक कर्ज देखील सरकारकडून माफ करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

तसेच संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं, ते देखील पाळण्यात न आल्याने राज्य सरकारच्या कर्जमाफीवर शेतकरी नाराज आहेत, म्हणून त्या नाराजीचा भाग म्हणून 8 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिली आहे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.