पाऊस दाखल, मात्र शेतकऱ्यांचा 'तेरावा' महिना सुरूच!

राज्यात खरीप हंगामातील पेरण्याची लगबग सुरु झाली आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यात पेरणीसाठी लागणाऱ्या भांडवलासाठी पिक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेचा फेऱ्या माराव्या लागत आहेत. दुष्काळात तेरावा महिना अशी इथल्या शेतकऱ्यांची गत झाली आहे.

Updated: Jun 15, 2017, 11:41 AM IST
पाऊस दाखल, मात्र शेतकऱ्यांचा 'तेरावा' महिना सुरूच! title=

प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार : राज्यात खरीप हंगामातील पेरण्याची लगबग सुरु झाली आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यात पेरणीसाठी लागणाऱ्या भांडवलासाठी पिक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेचा फेऱ्या माराव्या लागत आहेत. दुष्काळात तेरावा महिना अशी इथल्या शेतकऱ्यांची गत झाली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हे आदिवासी आहे. त्यात शाहू समाजही आहे मात्र अल्प शिक्षित असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा अपेक्षित लाभ मिळत नाही. त्यात शेतीसाठी पत पुरवठ्याची परिस्थिती तर अधिकच गंभीर आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सर्वाधिक शेतकऱ्याची खाती धुळे नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेत आहेत. मात्र बँकेची स्थिती नाजूक असल्याने शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळण्यास उशीर होतोय. त्यातच सरकारने कर्ज माफीचा निर्णय घेतल्यामुळे कोणत्याच नवीन सूचना आलेल्या नाहीत त्यामुळे आता बँका कर्ज देण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे ऐन पेरणीच्या काळात पैसे आणायचे कुठून? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय.

माझ्याकडे खते-बियाणे असं पेरणीचं साहित्य खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत... मी आता कुठून पैसे आणणार, असा प्रश्न पडलाय... बँकेत कर्ज घ्यायला गेलो पण, कर्ज मिळत नाही, अशी व्यथा सखाराम पाडवी यांच्यासारख्याच अनेक शेतकऱ्यांनी केलीय.  

शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांना उदिष्ट विभागून देण्यात आलंय. त्यातून शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळण्यासाठी सुलभ कर्ज मेळावे घेण्यात येत आसल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक व्ही आर पुरी यांनी दिलीये. मात्र, याचा फारसा लाभ शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही.

राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, ऐन पेरणीच्या वेळी ही घोषणा झाल्यानं 'एक ना धड भराभर चिंध्या' अशी अवस्था सध्या झालीय.