बोगस बियाणांच्या संकटाने बळीराजा हवालदिल

शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईबाबत कृषी विभागाला मर्यादा आहेत. 

Updated: Feb 14, 2020, 08:48 PM IST
बोगस बियाणांच्या संकटाने बळीराजा हवालदिल

किरण ताजणे, झी २४ तास, नाशिक : बोगस बियाणांच्या संकटाने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. सरकारी प्रयोगशाळेने केलेल्या तपासणीत राज्यात सहा वर्षांत तब्बल २३ हजार ६६८ बियाण्यांचे नमुने अप्रमाणित आढळून आलेत. गंभीर बाब म्हणजे अशा प्रकारे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईबाबत कृषी विभागाला मर्यादा आहेत. 

नाशिकच्या पळसे गावातील भाजीपाला उत्पादक शेतकरी रुंजा गायधनी यांनी ३ ऑक्टोबर २०१९ ला माधुरी कंपनीचं फ्लॉवरचं बियाणं घेतलं होतं. मात्र अर्धा एकरवरच्या फ्लॉवरला तीन महिन्यांनंतर कंद न आल्याने फसवणूक झाल्याचं, गायधनी यांच्या लक्षात आलं. या प्रकरणी न्यायाबाबत सरकारी यंत्रणेकडून त्यांची निराशा झाली. उलट देणेकऱ्यांचा तगादा सुरु झाला. त्यामुळे भरपाई मिळावी आणि संबंधित कंपनीवर कारवाई करावी, अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नाही अशी उद्विग्न प्रतिक्रिया गायधनींनी दिली आहे. 

गायधनी यांच्याप्रमाणेच राज्यातल्या असंख्य शेतकऱ्यांचीही अशा प्रकारे फसवणूक झालेली आहे. त्याचा अहवाल कृषी खात्याच्या गुणवत्ता विभागाने सरकारला सादर केला आहे. त्यात राज्यात २०१२ पासून २३ हजार ६६८ अप्रमाणित नमुने आढळून आल्याचं उघड झालं आहे. 

मात्र बोगस बियाणं आणि औषधांबाबत कारवाईचे अधिकार नसल्याने, राज्यातल्या कृषी विभागाचे हात बांधलेले आहेत. त्यामुळे असं कुठे घडत असेल तर त्यांची चौकशी करून कारवाई करू इतकंच आश्वासन कृषिमंत्री दादा भुसे यांनी यावर दिलंय. 

हैदराबाद, मुंबई, नाशिक शहरांत बोगस बियाणांचं रॅकेट सुरू असल्याचं आतापर्यंतच्या अनेक कारवायांतून उघड झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी सरकारने तातडीने पाऊलं उचलण्याची गरज आहे. नाही तर बोगस बियाणांमुळे निराशेतून बळीराजा एखादं टोकाचं पाऊल उचलू शकतो.