श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : जूनचा पंधरवडा उलटला, मृग नक्षत्राला देखील १२ दिवस झाले तरी देखील पाऊस नसल्याने शेतकरी आभाळाकडे नजरा लाऊन बसला आहे. अशात कृषी विभागाची माहिती न पोहोचल्याने यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धूळ पेरणी केली असून पेरलेले बियाणे मातीतच करपत आहे. यवतमाळ जिल्ह्यात तापमान ४२ अंश पार असून रखरखत्या उन्हात मशागतीची कामं केल्यानंतर आता शेतकरी धूळ पेरणी करताना दिसत आहे. वास्तविक पाहता जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस कुठेही बरसला नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे ढगांकडे लागले आहेत. सलग चार वर्षांचा दुष्काळ सोसल्यानंतर यंदा तरी पीकपाणी चांगले राहील अशी भाबडी अपेक्षा त्यांना वरुणराजाकडून आहे.
सुरुवातीला हवामान खात्याने वेळेवर चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तविल्याने शेतकरी आनंदात होते. मात्र बेभरवशाच्या निसर्गाने पुन्हा शेतकऱ्यांचा घात केला. चांगल्या उत्पन्नासाठी खरीप हंगामाची पेरणी मृग नक्षत्रावर केली जाते. मात्र मृगाचा पाऊस बरसला नाही त्यामुळे सद्यस्थितीत पेरणी धोकादायक आहे. परंतु याबाबत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना माहिती मिळाली नसल्याने त्यांनी शेतीत बियाणं रोवलं. एकमेकांचे अनुकरण करीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धूळ पेरणी उरकल्याने शेतकऱ्यांसाठी हा जुगार ठरला आहे.
रोहिणी नक्षत्रात कृषी विभागाने उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियाना तसेच शेतकऱ्यांमध्ये पेरणीविषयक कार्यशाळा, चर्चासत्र राबविल्याचे दावे केले. मात्र शेतकऱ्यांकडून सुरु असलेली पेरणीची कामे पाहिल्यास शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन नसल्याचे स्पष्ट होते. कृषी सहायक बांधावर जात नसल्याने आणि कृषी अधिकारी कागदोपत्री कार्यक्रम राबवित असल्यानेच कृषी क्षेत्र संकटात असल्याची स्थिती आहे.
शेतकरी उधार उसनवारी करून बियाणे खरेदी करीत असून अनेक गावांमध्ये बोगस बियाणं देखील शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात येत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांकडून धूळ पेरणी होत आहे. मात्र, अल्प पावसात पेरणी झाल्यास दुबार पेरणीचे संकट असल्याने जोवर १०० मिमी पाऊस होत नाही, तोवर पेरण्या करू नयेत असा कृषी तज्ञांचा सल्ला आहे.