अंबरनाथमध्ये बंद पडलेल्या कंपनीच्या परिसरात आग

अज्ञाताकडून आग लावली असल्याची माहिती मिळत आहे.

Updated: Feb 21, 2020, 08:07 PM IST
अंबरनाथमध्ये बंद पडलेल्या कंपनीच्या परिसरात आग title=

अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिमेकडील अहमद उलन मिल या बंद पडलेल्या कंपनीच्या परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे. अंबरनाथ अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. गेल्या दीड तासापासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सुरक्षा रक्षक असतांना अज्ञाताने आग लावली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. शुक्रवारी मुंबईत दादरच्या रणजीत स्टुडिओमध्ये अचानक आग लागली होती. मात्र अग्निशमन दलाचे जवान वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने ही आग नियंत्रणात आली. आगीचे लोट दिसताच स्थानिकांनी याबाबत अग्निशमन दलाला कळवलं. त्यामुळे सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही. स्टुडिओसमोरील एका ऑफिसलाही आग लागली होती. 

याआधी डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीलाही आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत संपूर्ण कंपनी भस्मसात झाली. डोंबिवलीतल्या मेट्रोपोलिटिन कंपनीला लागलेल्या भीषण आगीची झळ बाजूलाच असलेल्या वल्लभ पॅकर्स या कंपनीलाही बसली. त्यामुळे ही संपूर्ण कंपनीच जळून खाक झाली असून, या दुर्घटनेमुळे सुमारे एक हजार कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. 

डोंबिवली एमआयडीसीतील मेट्रोपोलिटन केमिकल कंपनी भीषण आगीत जळून खाक झाली. ही आग इतकी भीषण होती, की ही कंपनी असणारा एक किलोमीटरचा परिसर रिकामा करण्यात आला होता. या कंपनीत असणारे केमिकल ड्रमचे आगीमुळे लागोपाठ स्फोट होत होते. दुसऱ्या दिवसापर्यंत ही आग धुमसत होती.