घरकुल घोटाळा : सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांचा निकाल लागणार?

हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने सर्व संशयित त्यांचे वकील याना न्यायालयात बोलावण्यात आल्याची माहित सूत्रांकडून मिळतेय 

Updated: May 21, 2019, 09:31 AM IST
घरकुल घोटाळा : सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांचा निकाल लागणार? title=

प्रशांत परदेशी, झी २४ तास, धुळे : संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणाचा निकाल आज जिल्हा न्यायालयात लागण्याची शक्यता आहे. याप्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपलाय. या निकालामुळे जळगाव जिल्ह्यातील भविष्याच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. या घरकुल गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक दिग्गजांचा संशयितांमध्ये समावेश आहे. धुळे जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश सृष्टी नीलकंठ प्रकरणात निकाल देतील. जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात ४५ कोटी रुपयांचा अपहाराबाबत निकाल समोर येणार आहे. या सुरुवातीला ५७ संशयितांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते त्यातील ८ जणांचा मृतीव झाल्याची माहिती समोर आली असून ४९ संशयितांबाबत हा निकाल येणार आहे. हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने सर्व संशयित त्यांचे वकील याना न्यायालयात बोलावण्यात आल्याची माहित सूत्रांकडून मिळाली असून मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे. या निकालाची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागून आहे. 

घरकुल घोटाळ्यातील महत्त्वाच्या घडामोडी...

- १९९४ साली  झोपडपट्टी निर्मूलन आणि बेघरांसाठी ११ हजार ४२४ घरकुल बांधण्याचा पालिकेचा निर्णय 

- या घरकुलांसाठी ११० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा निर्णय जळगाव पालिकेने घेत हुडको कडून कर्ज घेतले 

- २००१ मध्ये या योजनेत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या

- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उचलले होते प्रकरण, त्यानंतर तीन आयोगामार्फत झाली चौकशी (न्यायमूर्ती पी बी सावंत आयोग, सुधाकर जोशी आयोग, सोनी आयोग)

- २००६ मध्ये २९ कोटी ५९ लाखांच्या गैरव्यव्हारा बाबत गुन्हा दाखल

- सुरुवातीला ९१ संशयित, ५७ संशयितांवर आरोपपत्र दाखल, ८ मयत, ४९ संशयितांबाबत निकाल देणार 

- एकूण पाच गुन्हे दाखल 

- पालिकेच्या मालकीचे नसलेल्या भूखंडावर कर्ज घेणे, कर्जाच्या रकमेची अफरातफर करून गैरव्यवहार करणे, हुडकोची फसवणूक करणे, कट कारस्थान रचणे, संगनमत करून गैर व्यवहार करणे असे आरोप 

- माजी मंत्री सुरेश जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर, प्रदीप रायसोनी, राजा मयूर अश्या दिग्ग्जच्या भविष्याचा फैसला 

- माजी मंत्री सुरेश जैन सर्वाधिक साडेचार वर्षापेक्षा अधिक काळ कारागृहात

- माजी मंत्री गुलाबराव देवकर हे देखील होते तीन वर्ष कारागृहात. 
 
- संशयित देवकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार 

- २०१४ मध्ये जैन आणि देवकर यांनी विधानसभा निवडणूक कारागृहातून लढवली होती, दोन्ही पराभूत झाले होते. 

- सर्व संशयित जामिनावर बाहेर आहेत. 

- दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण, सर्व संशयितांना आणि त्यांच्या वकिलांना न्यायालयात हजर राहण्याबाबत कळविण्यात आले. 

- महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात मोठ्या निकालपत्रांपैकी एक राहणार 

- विशेष पोलीस बंदोबस्त न्यायालयात करण्यात येणार तैनात

-  महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक निकाल ठरणार 

- राजकीय नेत्यांचे भवितव्य ठरणार 

- राजकीय नेते पुन्हा मोकाट सुटतील की अडकणार? याचा आज फैसला होणार