बीड : भगवानगडावर होणा-या वंजारी समाजाच्या दसरा मेळाव्याचा वाद पुन्हा एकदा पेटलाय. यानिमित्तानं कुणालाही राजकीय मेळावा घेऊ देणार नाही, अशी भूमिका डॉ. नामदेव महाराज शास्त्रींनी घेतलीय. तर दसरा मेळाव्यात भाषण करण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ मिळावा, अशी विनंती करणारं पत्र ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नामदेव शास्त्रींना लिहिलंय.
आदरणीय मठाधिपती न्यायाचार्य महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री,
तसं आपल्यात काय झालं, या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं नाही. पण आज आपल्याकडे आपली लेक एक पहिली आणि शेवटची विनंती करते आहे. वारणीच्या गहिनीनाथ गडाच्या सप्ताह समारोपाच्या कार्यक्रमात मी म्हणाले होते की, "मी लहान होते, तुम्ही मोठे व्हा..." कृपया त्या असंख्य लेकरांकडे बघा... काही नको, त्यांना फक्त 20 मिनिटं वेळ वर्षातून द्या...
मी कोणासमोर कधीही झुकले नाही, पण समाजासाठी नतमस्तक होते. आणि तुम्हाला विनंती करते की, तेवढे क्षण दिवाळीची माहेरची भेट म्हणून मला द्या... समाज बांधणं जमलं नाही, तर तो तोडणं तरी आपण होऊ देऊ नये... कोणत्याही माझ्या भावाला इजा होऊ नये, त्यांच्या भावना जपण्यासाठी कृपया विचार करून सकारात्मक निर्णय घ्याल ही अपेक्षा... शेवटी तुम्ही आणि मी यांच्यामुळं आहोत. यांच्यासाठी करणं आपलं कर्तव्यच आहे...
आपली
पंकजा गोपीनाथ मुंडे
(ग्रामविकास, महिला आणि बालविकासमंत्री)