मुंबई : सांगली जिल्ह्यातील मिरज येथे २६ कोरोना बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या सर्व रुग्णांना मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णांपैकी काल २४ रुग्णांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरसह आरोग्य पथकाचे कौतुक केले आहे.
सांगली जिल्ह्यात अचानक कोरोनाचा फैलाव झाल्याने राज्य सरकारने ठोस पावले उचलली. इस्लामपूरमध्ये यातील काही रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर काही तासातच कडक निर्बंध लादत संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता. दरम्यान, इस्लामपूरमध्ये कोरोनाचे चौदा रुग्ण बरे होऊन स्वगृही परतले. मिरज येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी गंभीर दखल घेतली होती.
सांगली जिल्ह्यातील कोविड-१९ ग्रस्त रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होऊ नये यादृष्टीने मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांवर तातडीने उपचार करून त्यांना पूर्णपणे बरे करण्याच्या दृष्टीने मुंबईतील ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली याच महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विनायक सावर्डेकर आणि डॉ. प्रशांत होवाळ यांची त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीने तातडीने सांगली येथे जाऊन परिस्थितीवर नियंत्रण व उपचाराच्या नियोजनाचे काम २८ मार्च रोजी हाती घेतले होते.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या लक्षात घेता गरज भासल्यास मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे ३१५ खाटांच्या कोविड-१९ रुग्णालयात तातडीने रूपांतर करण्यात आले होते. याच ठिकाणी सिटीस्कॅन, एम. आर. आय. लिक्विड ऑक्सिजन, सोनोग्राफी, डायलिसिस, व पंधरा बेडचे आय.सी.यू. सज्ज ठेवण्यात आले होते. सांगली जिल्ह्यातील २५ रुग्ण आणि यात आणखी एका रुग्णाची भर पडली होती. त्यामुळे मोठी चिंता व्यक्त करण्यात येत होती. आता २४ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, त्यांचे १४ दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.