सरकारचं माहीत नाही, पण 'निसर्ग' देणार अच्छे दिनाची अनुभूती

 सलग तिसऱ्या वर्षी मान्सून चांगला राहणार असल्याचं दिसतंय.

Updated: Apr 16, 2018, 04:53 PM IST
सरकारचं माहीत नाही, पण 'निसर्ग' देणार अच्छे दिनाची अनुभूती title=

मुंबई : यंदाचा मान्सून हा समाधानकारक राहणार असून सरासरीच्या ९७ टक्के पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे... ही बळीराजासाठी अत्यंत आनंदची बातमी आहे. विशेष म्हणजे यंदाच्या मान्सूनमध्ये पावसाच्या खंडाची शक्यता फार कमी असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे.

यामुळेच शेतकऱ्यांची चिंता दूर होण्याची शक्यता आहे. कारण गेल्या वर्षी लागवडीनंतर पावसानं उघडीप दिली होती. पुढचा हवामानाचा अंदाज १५ मे रोजी जाहीर केला जाणार आहे.

ऊन-वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून 

प्रगटली दोन पानं कशी हात ती जोडून 

टाळ्या वाजवती पानं दंग देवाच्या भजनी

जशी करती करुणा, होऊ देरे आबादानी

अशी कविता म्हणत शेतकरी विठ्ठलाकडे प्रार्थना करत आहेत. चांगला पाऊस झाला तर त्यांची ही आशा पूर्ण होणार आहे. 

अल-नीनोचा धोका कमी 

यामुळे, सलग तिसऱ्या वर्षी मान्सून चांगला राहणार असल्याचं दिसतंय. हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षी अल-नीनोचा धोकाही कमी झालाय. मान्सूनपूर्वी अल-नीनोची स्थिती न्यूट्रल राहील. नुकतंच 'स्कायमेट'नंही यंदाच्या वर्षासाठी अंदाज जाहीर केलाय. यातही मान्सून योग्य राहील आणि संपूर्ण ऋतूत ९६ ते १०४ टक्के पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. 

मे महिन्याच्या मध्यापर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची तारीख ठरेल आणि जूनमध्ये मान्सूनचा दुसरा अंदाज जाहीर होईल.