दिल्ली : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे गेल्या काही महिन्यांपासून युरोपसह अनेक देश सध्या चिंतेत आहेत. युद्ध सुरु झाल्यापासून या विध्वंसात अनेकांना जीव गमवावा लागला. अनेक लोक बेघर झाले. अनेक जवानांनाही प्राण गमवावे लागले आहे. या काळात अनेक ठिकाणं उद्धवस्त झाली आहेत. त्यामुळे इथली परिस्थिती अद्यापही सामान्य झालेली नाही.
युद्धाला कित्येक महिने उलटले तरी तरीही दोन्ही देश एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. दोन्हीपैकी कोणीही पराभव स्विकारलेला नाही. मात्र युद्धादरम्यान घडलेल्या एका प्रसंगाने सर्वांचीच मने जिंकली आहेत.
एकमेकांविरोधत युद्ध सुरु असूनही रशिया आणि युक्रेनमधील लोकांमधील प्रेम कमी झालेले नाही. याचेच उदाहरण भारतातील हिमाचलच्या धर्मशाला येथे पाहायला मिळाले. मंगळवारी रशियाचा तरुण आणि युक्रेनमधील तरुणी लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले. या खास लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
युक्रेनच्या तरुणीचं नाव एलोना ब्रामोका आहे तर रशियातील तरुणाचे नाव सर्गेई नोविकोव्ह आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान या प्रेमळ जोडप्याने हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे २ ऑगस्ट रोजी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्नगाठ बांधली.
दोघांनी सनातन धर्म आणि भारतीय रितीरिवाजानुसार लग्न केले आहे. स्थानिक पंडितांनी वैदिक मंत्रोच्चारांसह विवाह मंत्रांचे पठण केले. या जोडप्याने सात फेरे घेतले. स्थानिक लोकांनी या प्रेमळ जोडप्याला आशिर्वाद दिले आहेत. त्यानंतर हा विवाह संपूर्ण जगभरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
#WATCH | Himachal Pradesh: Sergei Novikov, a Russian national tied the knot with his Ukrainian girlfriend Elona Bramoka in a traditional Hindu ceremony in Dharamshala on August 2. pic.twitter.com/0akwm2ggWr
— ANI (@ANI) August 5, 2022
एक वर्षापासून धर्मशाळेत राहतायत दोघेही
एका माध्यमाच्या वृत्तानुसार, दिव्या आश्रम खरोटाचे पंडित संदीप शर्मा यांनी सांगितले की, सर्गेई आणि अॅलोना गेल्या एका वर्षापासून धर्मशाळेजवळील धर्मशाळेत एका कुटुंबासोबत राहत आहेत. त्यानंतर त्यांचे लग्न लावून देण्यात आले आहे. आश्रमाचे पंडित रमण शर्मा यांनी लग्नाचे सर्व विधी पार पाडून हा विवाह केला आहे.