मुंबई: मराठी माध्यमाच्या भूगोल विषयाच्या पुस्तकातील काही पानांवर गुजराती भाषेतील मजकूर आढळून आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यावरुन विरोधकांच्या हाती पुन्हा नवे कोलीत मिळाले असून त्यांनी शिक्षण विभाग आणि भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. गुजरातसमोर आणखी किती लाचारी पत्करणार, असा सवाल विरोधकांनी विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी या मुद्द्यावरुन गोंधळ घातल्याने विधानपरिषदेचे कामकाज अर्धा तासासाठी तहकूब करावे लागले.
मराठी माध्यमाच्या इयत्ता सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये गुजराती भाषेचा वापर करण्यात आल्याचे विरोधकांनी निदर्शनास आणून दिले. राज्यात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांच्या मार्फत सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक दिले जाते.
रायगड जिल्ह्यातील म्हसळा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शाळेतही हीच पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. यावरुन विरोधकांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. अशा प्रकारांमुळे भाजपाचे गुजराती प्रेम दिसून येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.