जावेद मुलानी, झी मीडिया, बारामती : सोशल मीडियावर नेहमीच अफवांचा बाजार मांढलेला दिसतो तर कधी टिंगल टवाळी होताना दिसते... त्यामुळे अनेकांना नाहक त्रास होत असतो. पण याच सोशल मीडियामुळे बारामतीमधील आयुष्याला कंटाळलेल्या एका महिलेला जगण्याची नवी उमेद मिळाली आहे. 'माफ करा पण मला आत्महत्या करावीशी वाटतेय' अशी पोस्ट फेसबुकवर हर्षदा झगडे यांनी ही पोस्ट केली होती.
हर्षदा या मुळच्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालूक्यातील पांडे या गवच्या विवाहानंतर त्या सासरी बारामतीत आल्या. मात्र, लग्नानंतर सहा महिन्यांतच त्यांचा वाद सुरु झाला. त्यांचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरु आहे. २००६ मध्ये हर्षदा यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च झाला. त्यांनी चरितार्थासाठी भाडोत्री जागेत खानावळीचा व्यवसाय सुरु केला. मात्र, डोळ्यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर घेतलेल्या औषधी गोळ्यांमुळे
'साईड इफेक्ट' झाला. हाडांवर विपरीत परिणाम होऊन शारीरिक व्याधी मागे लागल्याचे हर्षदा सांगतात.
माहेरच्यांसह सासरच्यांनी दुर्लक्षित केले. त्यातच अजारपण बळावले. याच आजारपणासाठी एका खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले. त्याची तीन पट रक्कम परत देऊनही तो सावकार आणखी पैशांची मागणी करत आहे. सावकाराचा नेहमीचा त्रास व वाढत चाललेल्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या करावीशी वाटत असल्याची पोस्ट फेसबुकवर केली.
हर्षदा यांना लिखानाची आवड असल्याने त्या नेहमीच वेगवेगळ्या विषयावर लिहत असतात. त्यामुळे फेसबुकवर त्याचे मोठे फ्रेंड सर्कल आहे. त्यांच्या या अचानक पडलेल्या आत्महतेच्या पोस्टमुळे या चाहत्यांनी काही क्षणात कमेंट्स करत त्यांना आत्महतेपासून परावृत्त करण्यासाठी कमेंट्स सुरू झाल्या. यात एका जागृत पत्रकाराने पोलिसांना या गांभिर्याविषयी कळविले.
पोलिसांनीदेखील संभाव्य धोका ओळखून त्या महिलेचा शोध घेत तिचे घर गाठले. व त्यांना जगण्याची नवी उमेद देत. त्यांना त्रास देनाऱ्या सावकारावर कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करून अटक केली आहे .
गुन्हा घडल्यानंतर उशिरा पोलीस घटनास्थळी पोहचतात अशी टीका नेहमीच होत असते... किंबहुना आपला समजही तसाच आहे... पण बारामतीतील पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका महिलेचा जीव वाचवून तिला जगण्याची नवी उमेद मिळाली आहे.