औरंगाबाद : तब्बल दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यात सर्वत्र कुठं रिमझिम तर कुठं मुसळधार पावसानं हजेरी लावली. लातूर उस्मानाबाद, बीड, नांदेड, परभणी, औरंगाबाद, हिंगोली अशा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसानं दमदार पुनरागमन केलंय.
बीड जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 49.15 टक्के पावसाची नोंद झालीये. जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 421 पैकी 170 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद मराठवाड्यातील विभागीय आयुक्तांनी दिली आहे. यात बीड तालुक्यातील म्हाळसजवळा वगळता सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झालीये.
या पावसामुळे करपत चाललेल्या खरीपाच्या पिकांना जीवदान मिळालंय. शनिवारपासून रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत मराठवाडयातील 156 मंडळात 50 ते 75 टक्यापर्यंत पाऊस झाला आहे. तर 196 मंडळात 75 टक्याहुन अधिक पावसाची नोंद झाली. दरम्यान, मोठे, मध्यम प्रकल्पात पाणीसाठा वाढ होण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे.
बीडमध्ये 74.82 मिमी, पाटोदा 97.50 मिमी, गेवराई 69.20, धारूर 57 मिमी, अंबाजोगाई 75 मिमी परळीमध्ये 58.40 मिमी आणि केजमध्ये 65.86 मिमी पाऊस झालाय. लातूर, उदगीर, निलंगा, शिरुर,अनंतपाळ, देवणी, औसा, अहमदपूर, चाकूर, जळकोट, रेणापूर अशा सर्वच तालुक्यात दमदार पाऊस सुरु आहे. परभणी जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसानंतर जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब वाहू लागलेत.
नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात मुसळधार पावसाने तडाखा दिला. 16 पैकी तब्बल 12 तालुक्यांमध्ये अतीवृष्टीची नोंद झाली. गेल्या 24 तासात मुदखेड मध्ये सर्वाधीक 199 मीली मीटर तर नांदेड तालुक्यात 144 मीली मीटर पावसाची नोंद झाली. या दोन तालुक्यांसह एकुण आठ तालुक्यात 100 मीमीहुन अधीक पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात एकुण सरासरी 100.86 मीमी इतका पाउस झाला. या पावसामुळे अर्धेअधीक शहर जलमय झालंय.