रायगड : रायगड जिल्हयाच्या बहुतांश भागात पाऊस सुरू असून दक्षिण रायगड मधील महड आणि पोलादपूर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे महड शहराच्या दोन्ही बाजूंनी वाहणाऱ्या गांधारी आणि सावित्री या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीची धोकापातळी 6.50 मीटर असून पावसामुळे पाण्याची पातळी 6.60 मीटरवर पोहोचली आहे.
शहरातील दस्तुरी नाक्यावर पाणी आलं असून महड ते रायगड रस्ता पाण्याखाली गेला आहे. नाते रस्ताही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. महड आणि परिसरात रात्रीपासून पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर महड शहराला पुराचा धोका संभवतो आहे. महड नगरपालिकेनं शहरातील नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. तसंच सर्व संबंधित यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.