नाशिक : राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस झाला आहे. तर अनेक गावांचा पाणीप्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासात या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. त्र्यंबकेश्वर येथील उमापासून ते थेट नाशिक शहरापर्यंत अनेक मंदिरे, वाहने पाण्यामध्ये गेली आहेत. गाडगेमहाराज पुलाजवळ एक कार पाण्यात अडकल्याने तिला काढण्याचा प्रयत्न जेसीबीद्वारे करण्यात येत आहे.
नाशिकमध्ये दमदार पाऊस झाल्याने गंगापूर, पालखेड धरण समूहांच्या पाणलोट क्षेत्रात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मुंबई हवामान विभागाने पुढील तीन तासांत अतिवृष्टिचा इशारा दिला असून जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शनिवारी रात्रीनंतर निशकात पावसाचा जोर अधिकच वाढला. आज सकाळपासून चांगला पाऊस होत आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात आज सकाळी साडेआठपर्यंत २४ तासांत ६४४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान, गोदावरी नदीमधील पाणी पातळी वाढली असून जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सावधनतेचा इशारा दिला आहे.