राज्यात पुढील 2 ते 3 दिवसांत अतिमुसळधार पाऊस, या भागांना बसणार तडाखा

Rain in Maharashtra :विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणासाठी महत्त्वाची बातमी. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. 

Updated: Sep 7, 2021, 08:15 AM IST
राज्यात पुढील 2 ते 3 दिवसांत अतिमुसळधार पाऊस, या भागांना बसणार तडाखा title=
संग्रहित छाया

मुंबई : Rain in Maharashtra :विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणासाठी महत्त्वाची बातमी. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात, पुढचे 2 ते 3 दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा  हवामान विभागाने दिला आहे. (Heavy rains in Maharashtra in next 2 to 3 days)  मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये त्याचा प्रभाव जास्त असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

कोकणात मुसळधार, चिपळूण-दापोली शहरात पाणी भरण्यास सुरुवात

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुन्हा पाणी भरण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दापोलीलाही पावसानं झोडपले आहे. केळसकरनाका येथे रात्री मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात, पुढील दोन ते तीन दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा, हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये त्याचा प्रभाव जास्त असेल. 

यवतमाळसह नेर तालुक्यात गारपीट 

यवतमाळसह नेर तालुक्यातील गावांत गारपीट झाली. वाई हातोला, आनंद नगर, टाकळी सलामी, पिंपरी कलगा, माणिकवाडा गावांना गारांचा तडाखा बसला. यासोबत आर्णी, पुसद, उमरखेडमध्येही जोरदार पाऊस बरसला. सध्या पीकपरिस्थिती चांगली असली तरी गारपिटीमुळे पिकांना तडाखा बसू शकतो. महसूल प्रशासन पीक नुकसानीचा अहवाल प्रशासनाला सादर करणार आहे.

विष्णूपुरी धरण पूर्ण भरले

नांदेडमधील विष्णूपुरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानं, प्रकल्पाचे 7 दरवाजे उघडण्यात आलेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात करण्यात येतोय. सध्या 2 हजार 436 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. 

परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस

परभणी जिल्ह्यासह शहरात जोरदार पाऊस बरसला. तर सेलू तालुक्यातील कूपटा भागालाही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. त्यामुळे सेलू कूपटा रोडवरील काही गावांचा संपर्क तुटला. तर पालम शहरालगत असलेल्या लेंढी नदीला पूर आला. त्यामुळे जांभूळ बेटाकडे जाणा-या 5 गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

परभणी जिल्ह्यात बैल पोळ्याच्या सणालाच एका शेतकऱ्याची बैलजोडी पुरात वाहून जाता जाता वाचली. सेलू तालुक्यातील कुपटा गावातल्या गणेश शिंपले बैलांना घेऊन घरी येत होते. मात्र गावाबाहेरच्या ओढ्याला पूर होता. गणेश शिंपलेंनी पूल ओलांडायचा प्रयत्न केला. ओढ्यावरचा पूल तुटलेला असल्यानं एका पाठोपाठ दोन्ही बैल पुरात वाहू लागले. सुदैवाने  काही अंतरावर बैल पुरातून बाहेर आले.