पुणे : पुणेकरांनो यापुढे दुचाकी चालवताना हेल्मेट वापरा. पोलीस कारवाईसाठी सज्ज आहेत. कारण आजपासून अखेर हेल्मेटसक्ती लागू झाली आहे. पुणेकरांनी वारंवार हाणून पाडलेली ही हेल्मेटसक्ती लागू करताना पोलिसांनी आज मोठ्या प्रमाणात कारवाईचा बडगा उगारला आहे.
हेल्मेट न वापरणाऱ्यांना पुणे वाहतूक पोलिसांनी ३१ डिसेंबरलाच मोठा दणका दिला. गेल्या आठवड्यात दुचाकी न वापरणाऱ्या जवळपास ३० हजारांहून अधिक दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. तर ३१ डिसेंबरला एकाच दिवसांत ५ हजार दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आलीय. अपघाती मृत्यू टाळण्यासाठी दुचाकीस्वारांना हेल्मेट आवश्यक आहे. पुणेकर भाजपाला निवडून देतात त्यामुळे हेल्मेटसक्तीचा आदेश काढणाऱ्या नितीन गडकरींचं पुणेकर ऐकतील, असा टोला परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी लगावला.
हेल्मेट विरोधी कृती समितीने संघर्षाचा इशारा दिलाय. हेल्मेट न वापरल्याने तुमच्यावर कारवाई होत असेल तर आमदाराला फोन करा असं आवाहन हेल्मेट कृती समितीने पुणेकरांना केलंय. हेल्मेटच्या नावाखाली पैसे उकळण्याचा पोलिसांचा धंदा असल्याचा आरोप कृती समितीने केलाय. हेल्मेट सक्ती मागे घेण्यासाठी निवेदन देण्यासाठी समितीतर्फे कार्यकर्ते हेल्मेट न घातला आयुक्त कार्यालयावर धडकणार आहेत.
हेल्मेटसक्तीसाठी पोलीस ठाम आहेत. तर हेल्मेट विरोधी कृती समितीही संघर्षाच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे आता पुणेकर दरवेळप्रमाणे ही सक्ती हाणून पाडतात की पोलीस सक्ती लागू करण्यात यशस्वी होतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.