मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करतो. याचा अर्थ आज ती साजरी करू नये असा होत नाही. महाराजांची जयंती एक दिवस नव्हे तर वर्षाचे ३६५ दिवस साजरी करावी असे त्यांचे कर्तृत्व आहे, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
चांदिवली येथे मनसे शाखेचे उदघाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. आज व्यासपीठावर भाषणासाठी नाही तर तुमचे दर्शन व्हावे यासाठी आलो आहे. अशी साद त्यांनी मनसैनिकांना घातली.
आज शिवजयंती आहे. मनसे पक्ष शिवजयंती तिथीने साजरी करतो. याचे कारण म्हणजे आपल्याकडे जेवढे सण येतात. दिवाळी येते गणपती येतात ते तिथीने येतात. गणपती गेल्यावर्षी कोणत्या तारखेला आले ते यावर्षीही त्याच तारखेला येतील असे नाही. कारण ते तिथीने येतात.
जन्मदिवस, वाढदिवस हे आपले असतात. पण, महापुरुषांचा आणि तो ही छत्रपतींचा जन्मदिवस हा आपल्यासाठी एक सणच आहे. त्यामुळे आजचा दिवसही सण म्हणून साजरा करण्यास हरकत नाही. मात्र, तिथीने ज्यादिवशी शिवजयंती येते त्यादिवशी याहीपेक्षा मोठ्या उत्साहाने ती तुमच्याकडून साजरी झाली पाहिजे असे राज यावेळी म्हणाले.
दुकान वाटू नये...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज इथे शाखा सुरु होतेय याचा आनंद आहे. इथे येणाऱ्या लोकांना शाखेत न्याय मिळतो असा विश्वास निर्माण झाला पाहिजे. कुणालाही हे दुकान आहे असे वाटू नये याची काळजी घ्या, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
म्हणून आवडत नाही रांगोळी
मला रांगोळी आवडत नाही असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. पण, आज इथे काढलेली ही रांगोळी मी इथून गेल्यानंतर सर्वानी पहा असं म्हणत राज ठाकरे यांनी रांगोळी कलाकाराचं कौतुक केलं. ही एकच कला अशी आहे कि जी मला आवडत नाही असं ते म्हणाले. याचं कारण सांगताना ते म्हणाले, कोणत्याही कार्यकमाला, सभारंभाला मोठ्या हुशारीनं कलाकार रांगोळी काढतो. पण, कार्यक्रम आटोपला को ती पुसावी लागते. त्यामुळे मला रंगोली आवडत नाही.