Sudhakar Shinde: मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांचा कालावधी वाढवून देण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. सुधाकर शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील अधिकारी असल्याचे म्हटले जाते. आता सुधाकर शिंदे यांची त्यांच्या मूळ ठिकाणी रवानगी होणार आहे.
सुधाकर शिंदे यांचा महानगरपालिकेतील कालावधी हा 23 नोव्हेंबर 2023 ला संपुष्टात आला होता. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील सुधाकर शिंदे हे अधिकारी असल्याने त्यांची बदली केली जात नाही असा सुर पालिकेत होता. सुधाकर शिंदे यांच्या विरोधात अनेक राजकीय पक्षांनी मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्तांकडे तक्रार केल्या होत्या.
शिवसेना नेते अनिल परब आणि भाजपच्या नेत्यांनी देखील सुधाकर शिंदे यांच्या विरोधात तक्रार केल्या होत्या व विधानभवनामध्ये देखील आवाज उठवला होता. भाजपच्या ठाकरे गटाच्या आणि इतर नेत्यांच्या सुधाकर शिंदे यांच्या विरोधात तक्रार असून देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुधाकर शिंदे यांच्यावर कारवाई किंवा बदली केली नव्हती.
सुधाकर शिंदे हे IRS अधिकारी असल्याने थेट केंद्रातून आता त्यांची बदलीची ऑर्डर निघाली आहे. भाजपच्या काही नेत्यांनी हस्तक्षेप करून ही बदली केली असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. पालिकेतील अनेक कामकाजात सुधाकर शिंदे यांचा मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून हस्तक्षेप असायचा असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता
राज्यातून मुख्यमंत्री त्यांची बदली करत नसल्याने थेट केंद्रातून बदली झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा मोठा झटका मानला जात आहे.
सुधाकर शिंदे हे सध्या मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत होते. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पद हे प्रशासकीय वर्तुळात अत्यंत प्रतिष्ठेचे पद मानले जाते. याआधी ते पनवेल महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे महात्मा फुले जन आरोग्य अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती.