खेडकरांचा पाय आणखी खोलात! व्हायरल व्हिडीओनंतर IAS पूजाच्या आईवर पोलिसांची मोठी कारवाई

IAS Puja Khedkar Controversy: आयएएस पूजा यांच्या आईचा वाद घालतानाचा एक जुना व्हिडीओ बाहेर आला.त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 13, 2024, 08:52 AM IST
खेडकरांचा पाय आणखी खोलात! व्हायरल व्हिडीओनंतर IAS पूजाच्या आईवर पोलिसांची मोठी कारवाई title=
ManoramaKhedkar Controversy

IAS Puja Khedkar Controversy: नियती एकदा द्यायला लागली की भरभरुन देते आणि घ्यायला लागली की देखील भरभरुन घेते, असं जुनजाणते म्हणतात. खेडकर कुटुंबीयांच्या बाबतीत हे खरं होताना दिसतंय. खेडकर कुटुंबाकडे पद, प्रतिष्ठा, पैसा सर्वकाही होतं. पण जास्त काहीतरी हवं आणि ते कायदा पाळून मिळू शकत नाही. मग पदाचा गैरवापर करुन मिळवायचा प्रकार झाला. एक छोट्याश्या तक्रारीनंतर मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागली आणि खेडकर कुटुंबीयांचा पाय हळुहळू खूपच खोलात गेला. महाराष्ट्रात सध्या आयएएस पूजा खेडकर प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. ट्रेनी आयएएस म्हणून पुण्यात रुजू झालेल्या पूजा खेडकर यांनी खासगी ऑडिवर लाल दिवा आणि महाराष्ट्र शासनची पाटी लावली. तसेच स्वत:साठी स्वतंत्र केबिन मागितली. यानंतर त्यांच्याविरुद्ध तक्रार गेल्यानंतर हळुहळू आधीची सर्वच प्रकरण बाहेर येत गेली. आयएएस होताना अंपग असल्याचे प्रमाणपत्र, कमी उत्पन दाखवून ओबीसीतून आरक्षण घेत नॉन क्रिमिएल जोडणे, वैद्यकीय चाचणीसाठी गैरहजर राहणे असे अनेक प्रकार समोर आले. हे कमी होतं म्हणून की काय पूजा यांच्या आईचा एक जुना व्हिडीओ बाहेर आला.त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. 

वादग्रस्त प्रोबेशनरी आयएस पूजा खेडकर यांचे कारनामे हळुहळू जगासमोर येत असतानाच आई मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.  ज्यामध्ये मनोरमा खेडकर या हातात बंदूक घेऊन मुळशीमधील एक शेतकरी कुटुंब आणि त्याच्या शेतावर काम करणाऱ्या मजुरांना धमकावत असल्याचे दिसत होते. आता हे प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतलं आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनोरमा यांच्यावर काय कारवाई झाली? असा प्रश्न विचारला जाऊ लागला.जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणात मनोरमा खेडकर यांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवता आले नव्हते. त्यांनी आपल्याकडे असलेली बंदूक बाहेर काढून धमकावण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराबद्दल मनोहर खेडकर यांच्या विरोधात पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 पोलिसांवर आणला होता दबाव 

ही घटना गेल्या वर्षी 5 जूनला घडली होती. मात्र खेडकर यांच्या दबावातून पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता असं तक्रारदाराचा म्हणणं आहे. मात्र आता पूजा खेडकर यांचे प्रकरण बाहेर आल्यानंतर त्यांच्या आईचे प्रताप देखील चर्चेत आले आहे.  महत्त्वाचं म्हणजे पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणासाठी असताना पूजा खेडकर यांनी देखील या जमिनीच्या प्रकरणात हस्तक्षेप करत पोलिसांवर दबाव आणला होता अशी माहिती मिळतेय. दरम्यान मनोरमा खेडकर यांनी स्वसंरक्षणार्थ पिस्तूल सोबत बाळगलं होतं असा दावा त्यांच्या वकिलांनी केलाय.

नेमका काय घडला होता प्रकार?

आयएएस पूज खेडकर यांच्या कुटुंबानं पुण्यातील मुळशी तालुक्यात 25 एकर जमीन खरेदी केली आहे. या जागेवरुन शेतकरी आणि मनोरमा खेडकर यांच्यात हा वाद सुरु झाला. 'जागा माझ्या नावावर आहे. मूळ मालक मी आहे. सातबारा माझ्या नावावर आहे. मला आधी कोर्टाचा कागद आणून दाखवायचा," असं मनोरमा म्हणत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसतंय. इथपर्यंत सर्व ठिक आहे पण हे सांगत असताना मनोरमा यांनी पिस्तूल बाहेर काढलं आणि वाद घालू लागल्या. 

'मी कोर्टात येणार, काय व्हायचं ते होऊ दे," असं मनोरमा शेतकऱ्यांना सांगतात. व्हिडीओ शूट करणारा शेतकऱ्यांबरोबरची व्यक्ती, 'मॅडम आपलं कायदेशीर सुरु आहे. तुम्ही आम्हाला का त्रास देताय?' असं विचारतो. त्यावर मनोरमा, "तुम्ही मला कायद्याचं सांगू नका. कायद्याने मला सांगितलेलं नाही की तुम्ही करु नका म्हणून," असं उत्तर देताना दिसतात. त्यानंतर बराच वेळ हा वाद सुरु होता. गेल्यावर्षी झालेल्या या प्रकारानंतर आता वर्षभराने मनोरमा अडचणीत आल्या आहेत.