Maharashtra Weather Update: महाराष्ट्रातून मान्सूनने माघार घेतली आहे. मात्र तरीही राज्यातील बहुतांश भागात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात दुपारच्या वेळेस ढग दाटून येतात आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात होते. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण महाराष्ट्रात 23 ऑक्टोबरपर्यंत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसणार आहे. मात्र, 19 आणि 20 ऑक्टोबरदरम्यान नाशिक, अहमदनगर,पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपीट होईल, असा अंदाज हवामन विभागाने वर्तवला आहे.
पूर्व – मध्य अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. तसेच चक्राकार वाऱ्यांची स्थितीही निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील बहुतांश भागात पावसाचा अंदाज आहे. पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पाऊस कायम राहील. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात रविवार, सोमवारी मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या कालावधीत राज्यातील अन्य भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पावसामुळे कमाल तापमानात घट झाली असली तरी दिवसा उन्हाचा चटका आणि सांयकाळी काहीसा गारवा असे वातावरण सध्या मुंबईत आहे. ढगाळ वातावरणामुळे आणखी एक ते दोन दिवस कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. मात्र, वातावरणातील आर्द्रतेमुळे उकाडा सहन करावा लागेल. तसेच सायंकाळी किंवा रात्री पाऊस पडण्याची शक्यता असून त्यावेळी वातावरणात काहीसा गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या विविध भागात मागील काही दिवसांमध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या तसेच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पावसामुळे झालेल्या शेतीच्या तसेच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
राज्यातील विविध भागांमध्ये अमरावती, पुणे, नाशिक, कोल्हापूर, मराठवाडा आदी विविध भागातील विविध जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये मागील काही दिवसात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी शेतपिकांचे नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी शेतात काढून ठेवलेल्या विविध प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले आहे. काढलेली पिके भिजली आहेत. विशेषतः भात, सोयाबीन, तूर, कपाशी, ऊस आदी विविध प्रकारच्या पिकांसह फळबागांचेही नुकसान झाले आहे.