मुंबई : मुंबई, ठाण्यासह कोकणात आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागांतही पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात मात्र, काही ठिकाणीच तुरळक पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. राज्यभरात पुढील दोन ते तीन दिवस संपूर्ण कोकण विभागासह मुंबई, ठाणे परिसरात काही भागांत जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट विभाग आणि विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.
मुंबईत आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. रात्री मुंबईतील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. मरिन ड्राइव्ह वरचं सध्याचं दृश्य आल्हाददायक असं आहे.
वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला. तर खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीच्या कामांना वेग आलाय. तसंच पावसामुळं ग्रामीण भागातील अनेक ठिकाणचा वीज पुरवाठा रात्री पासुन खंडित झालाय. जोरदार पाऊस बसल्यानं अनेक ठिकाणी पाणी साचलेलं दिसून आलं. तसंच शेतक-यांमध्येही आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं.
पालघरमध्ये पावसाची संततधार सुरुय. पालघरमध्ये रात्रभर पाऊस बरसतोय. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय.
रायगड जिल्ह्यातल्या कर्जतमध्ये नदीत अडकलेल्या तरूणांच्या सुटकेचा थरार पाहायला मिळाला. कर्जत तालुक्यातील वैजनाथ इथल्या पेज नदीला टाटा पॉवरचं पाणी आल्यानं हे तरुण नदीत अडकले होते. याठिकाणी पर्यटनासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील आठ तरूण आले होते. या आठही तरूणांना वाचवण्यात यश आलंय. नदीची पाणीपातळी वाढेल याचा अंदाज न आल्यानं हे तरूण अडकून पडले.
जळगाव शहरात वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला.अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. या पावसानं वातावरणात गारवा निर्माण झाला. तर शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हा पाऊस मुसळधार असला तरी तो पेरणीयोग्य नसल्याचं शेतक-यांनी सांगितलं.
वर्ध्यातही पावसानं हजेरी लावली. शहरातील सेलू, वर्धा,पिपरी, भुगाव, वायगाव, आर्वी नाका परिसरात जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतक-यांमध्ये आनंदाचं वातवरण आहे. तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. आता शेतक-यांच्या पेरणीच्या कामांना वेग येणार आहे.
इंदापूर तालुक्याच्या काही भागात आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरण आणि उकाडा कायम असताना इंदापूर तालुक्यातील सरडेवाडीसह काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
अकोला शहरातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली. पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वातावरणात गारवा निर्माण झालायं. येत्या काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर आणि वेल्हा तालुक्यात पावसानंतर बहुतांश शेतकऱ्यांची भात पेरणी आटोपलीयं. मात्र पेरणीनंतर पाऊस लांबणीवर पडल्यानं याचा परिणाम भात रोपांवर होतोय. पाऊस नसल्यानं भात उगवणीवर परिणाम होतोय. तसंच पावसाअभावी भात रोपांची वाढ मंदावलीयं. त्यामुळं शेतक-यांची चिंता वाढलीय.
अमरावती जिल्ह्यातल्या शिरजगाव कसब्यातील केळी पिकाचं प्रचंड नुकसान झालंय. या पावसामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातल्या चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसब्यात पावसानं धुमाकूळ घातला. त्यामुळे केळीच्या बागांचं मोठं नुकसान झालंय. मुसळधार पावसामुळे खरिपाची पेरणी कशी करायची असा प्रश्नही शेतक-यांसमोर पडलाय.