मुंबई : महाराष्ट्राला सध्या ऊन्हाची चांगलीच झळ बसत असून तापमान दिवसेंदिवस वाढ होत चाललं आहे. एप्रिल महिन्यात १६ दिवस महाराष्ट्रत देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सध्या विदर्भात तापमानाने उच्चांक गाठलाय. विदर्भात हिट वेव्ह घोषित करण्यात आली आहे. पुढील पाच दिवस विदर्भाचा पारा चढलेला असेल. तसंच परभणी, नांदेड, जळगाव, मालेगावात पारा ४२ अंशांच्या वर आहे.
जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा चढताच असून जळगाव तसंच भुसावळचे तापमान ४४ अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत नोंदले गेले. सर्वच तालुक्यातील तापमान वाढलंय. वाढत्या तापमानामुळे सकाळपासून उन्हाचे चटके लागायला सुरवात होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत उन्हाच्या झळा बसतात. कडक उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं देखील मुश्किल होतंय. दुपारी उन्हामुळे रस्तेही ओस पडू लागलेय, उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, रुमाल, सनकोटचा नागरिकांना उपयोग करावा लागतोय.