साई भक्तांसाठी रेल्वेकडून खास 'गिफ्ट'

तिकीटाच्या बुकींगसह होणार दर्शनाचे बुकींग

Updated: Jan 24, 2019, 05:19 PM IST
साई भक्तांसाठी रेल्वेकडून खास 'गिफ्ट' title=

नवी दिल्ली : साई बाबांच्या शिर्डीत जाणाऱ्या भक्तांसाठी नवीन वर्षात भारतीय रेल्वेकडून खास भेट देण्यात आली आहे. आता शिर्डीला जाणाऱ्या भक्तांना रेल्वे तिकीटाच्या बुकींगसह साई बाबांचे दर्शन घेण्यासाठीही तिकीट बुक करता येणार आहे. भारतीय रेल्वेच्या या निर्णयामुळे दर वर्षी करोडोंच्या संख्येने जाणाऱ्या भक्तांना खास सुविधा मिळेल. रेल्वेच्या या नवीन योजने अंतर्गत साईंच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना दर्शनासाठी तिकीट बुक करण्यासाठी सुविधा काही निवडक स्थानकांवरच देण्यात येणार आहे. साई भक्तांसाठी रेल्वेकडून देण्यात येणारी ही सुविधा येत्या २६ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे.

शिर्डी साई नगर, कोपरगाव, मनमाड, नाशिक आणि नागरसोल या स्थानकांचे ई-तिकीट बुक करतानाच भक्त साईंच्या दर्शनासाठी ऑनलाईन तिकीट बुक करू शकतात. या सुविधेमुळे भक्तांना मंदिर परिसरात दर्शनासाठी लांब रांगेत उभे राहण्याची गरज असणार नाही. दर्शनासाठी ऑनलाईन तिकीटाची वैधता ट्रेन स्थानकांत पोहचल्यानंतर पुढील ४८ तासांपर्यंत असणार आहे. 

रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी प्रवाशांच्या सुविधेसाठी २२ ट्रेनचे मार्ग वाढवण्याची घोषणा केली आहे. पीयुष गोयल यांनी रेल्वे ट्रेनचे मार्ग वाढवून एक नवीन प्रयोग करत असल्याची माहिती दिली. ट्रेनचे मार्ग वाढवल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांना याचा फायदा होणार आहे. उदाहरण देताना त्यांनी गतिमान एक्सप्रेसला झांसीपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी सुविधा होणार असल्याचं म्हटलंय.