फार्महाऊसवर गोळीबारीचा सराव केला- पांगरकरची कबुली

Updated: Aug 27, 2018, 09:39 AM IST

जालना : जालन्याचे माजी नगरसेवक खुशालसिंह राणा ठाकूर यांच्या रेवगाव शिवारातील फार्म हाऊसची एटीएसने रविवारी  झाडाझडती घेतली. याच फार्म हाऊसवर बॉम्ब तयार करण्याचा आणि पिस्तूल चालविण्याचा सराव केल्याची कबुली माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरने दिल्याची सूत्रांची माहिती आहे, त्यानंतर एटीएसने हा परिसर पिंजून काढलाय.

धक्कादायक माहिती 

 डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेला जालन्याचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर याने चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती उघड केल्यानंतर औरंगाबादच्या दहशतवादविरोधी पथक, बॉम्बशोधक व नाशकपथक, डॉग स्न्वॉड आणि फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने कारवाई केली. दोन टाटा सुमो आणि एका इनोव्हासह पाच वाहनांतून ३० जणांचे पथक पोहचले होते. 

पाच खोल्यांच फार्महाऊस

जालना बायपासने अंबड रोडवरील रेवगावजवळ माजी नगरसेवक राणा ठाकूर यांची 22 एकर जमीन आहे. या शेतात पाच खोल्यांचे फार्म हाऊस आहे. पाच रूमच्या फार्म हाऊसमध्ये मुक्काम करून श्रीकांत पांगारकरने  बॉम्ब बनविले तसेच पिस्तूल चालविण्याचा सरावही केला. बॉम्ब बनविण्याचे साहित्य विहिरीत टाकल्याच्या संशयाने पोलिसांनी विहिरीची तपासणी केली.