अमर काणे, झी मीडिया, नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कार्यालयात धमकी देऊन खंडणी मागण्याच्या प्रकरणातला आरोपी जयेश पुजारी (Jayesh Kantha) उर्फ शाकीर उर्फ जयेश कांथाने शुक्रवारी तुरुंगात मोठा गोंधळ केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे 100 कोटींच्या खंडणीची (Extortion) मागणी करुन त्यांना बॉम्बस्फोटने उडवण्याची धमकी देणाऱ्या जयेश कांथाने नागपूर पोलिसांना (Nagpur Police) चक्रावून सोडलं आहे. आता त्याच्या तुरुगांतील कृत्यामुळे पोलिसांचेही धाबे दणाणले आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खामल्यातील जनसंपर्क कार्यालयात काही महिन्यांपूर्वी जयेश कांथा याने थेट दाऊदचे नाव घेऊन धमकीचा फोन केला होता. नितीन गडकरींनी 100 कोटी रुपयांची खंडणी द्यावी नाहीतर भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयात आणि गडकरी यांच्या घरी बॉम्बस्फोट करू, अशी धमकी जशेय कांथाने दिली होती. या सगळ्या प्रकारानंतर नागपूर पोलिसांनी जयेश कांथाचा शोध लावला होता. तो बेळगावातील कारागृहात फाशीची शिक्षा झालेला कैदी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते.
जयेश कांथाने बेळगावच्या तुरुंगात असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात 14 जानेवारी आणि 21 मार्चला धमकीचे कॉल केले होते. त्यानंतर नागपूर पोलिसांनी बेळगावच्या तुरुंगातून जयेश कांथाला ताब्यात घेत नागपुरात आणले होते. नागपुरात त्याच्या विरोधात युएपीए अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासूनच जयेश कांथा नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र शुक्रवारी जयेशने त्याच्या बरॅक समोर लोखंडी गजांना लावलेल्या बारीक जाडीचे काही तुकडे खाल्ले आणि नंतर मी लोखंडी तार खाल्ली असा कांगावा केला होता.
हा सगळा प्रकार कळताच कारागृह प्रशासनाने लगेच जयेश कांथाला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेऊन त्याची तपासणी केली. त्याची सोनोग्राफी देखील करण्यात आली. सोनोग्राफी रिपोर्टमध्ये तारेच्या जाळीचा अत्यंत बारीक तुकडा जयेशच्या पोटात दिसून आला मात्र त्यापासून धोका नसून नैसर्गिक पद्धतीने शौचाद्वारे तो बाहेर निघेल अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
या सगळ्या प्रकारानंतर जयेश उर्फ शाकीर उर्फ कांथाला पुन्हा जेलमध्ये आणण्यात आले आहे. गेले अनेक दिवस जयेश उर्फ शाकीर पुन्हा त्याला बेळगाव जेलमध्ये पाठवण्यात यावं अशी मागणी करत आहे. त्यासाठीच जयेशने हा गोंधळ घातला असावा असा संशय कारागृह प्रशासनाला आहे.