जेईई-नीट परीक्षा : विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही : विजय वडेट्टीवार

पूर्व विदर्भातील पूरग्रस्त भागात जेईई-नीटची परीक्षा पुढे ढकलता येणार नाही, असा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.  

Updated: Sep 1, 2020, 12:50 PM IST
जेईई-नीट परीक्षा : विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही : विजय वडेट्टीवार  title=

मुंबई : पूर्व विदर्भातील पूरग्रस्त भागात जेईई-नीटची परीक्षा पुढे ढकलता येणार नाही, असा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला नाही. दरम्यान, कुठल्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ देणार नाही, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.

पूर्व विदर्भातल्या ज्याठिकाणी परीक्षा केंद्र आहेत त्याठिकाणी पूर नाही. एखादा विद्यार्थी पोहचू शकला नाही तर त्याने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत रिप्रेझेंटशन करावे, एनटीए त्यावर निर्णय घेईल. कुठल्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही पण परीक्षा पुढे ढकलणार नाही असं नागपूर खंडपीठाने म्हटले. दरम्यान कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नसल्याचं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी म्हटले आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही - उद्य सामंत

आजपासून ते ६ सप्टेंबर २०२० या कालावधीमध्ये जेईई मुख्य आणि  १३ सप्टेंबर २०२० रोजी नीट परीक्षा होणार आहे. विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे  या भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.  या भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य नाही. ही पार्श्वभूमी लक्षात घेता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी संवाद साधला. सामंत यांनी विद्यार्थ्यांचे कसलेही शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये,अशी विनंती केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांना केली आहे. ही विनंती त्यांनी तात्काळ मान्य करीत या भागातील एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आश्वासन दिले.

 नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला ही परीक्षा केंद्र आहेत. परीक्षा ही सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ या वेळेत होणार आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथील जवळपास १५ हजारांहून अधिक विद्यार्थी ‘जेईई-मेन्स’मध्ये सहभागी होणार आहेत. पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला असून पूलदेखील पाण्याखाली गेले आहेत. अशा स्थितीत गावांपासून परीक्षेच्या केंद्रावर  पोहोचणे अडचणीचे आहे. 

पुराचा मोठा तडाखा

चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी आता काही प्रमाणात ओसरायला सुरुवात झाली असली तरी पुराचा धोका कायम आहे गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीत होणारा पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने पूरग्रस्त गावातील पाणी पातळी दोन ते तीन फूटपर्यंत कमी झाली आहे. मात्र पुरात अडकलेल्या १४०० लोकांना गावाबाहेर काढण्याची महत्वाची कामगिरी प्रशासनाला पार पाडावी लागणार आहे.  

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात वैनगंगा नदीकाठच्या शेकडो गावांना पुराने वेढले आहे. यातील पंधरा गावे अतिबाधित आहेत. या सर्व गावांमध्ये वायुदलाच्या हेलिकॉप्टर द्वारे खाद्य पाकिटे व पाणी पोहोचविले गेले. गेले तीन दिवस हा भाग पूरग्रस्त आहे . राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या भागाची हवाई पाहणी केली तेव्हा परिस्थिती अपेक्षेपेक्षाही बिकट असल्याचे पुढे आले आहे.

 गडचिरोली जिल्ह्यातील महापूराची तीव्रता जास्त दिसून येत आहे. वडसा येथील रेल्वे पुलावरून पुराची परिस्थिती किती अधिक आहे ते दिसत आहे. गोसेखुर्द धरणातून पाणी सोडल्यानंतर वैनामाय कोपल्याचे हे दृश्य थरकाप उडविणारे आहे. या भागातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या रेल्वे पुलाला  पाणी स्पर्श करत आहे.