जात पंचायतीचा बळी; जातीत न घेतल्याने तरुणीची आत्महत्या

अंत्यसंस्कारासाठी २० हजारांची मागणी...

Updated: Jan 24, 2020, 03:22 PM IST
जात पंचायतीचा बळी; जातीत न घेतल्याने तरुणीची आत्महत्या title=

जळगाव : कंजारभाट समाजाने जातीत घेतले नाही म्हणून जळगावमध्ये विवाहितेने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव मुस्कान उर्फ मानसी बागडे असून ती अवघ्या १९ वर्षांची होती. धक्कादायक बाब म्हणजे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी देतानाही जात पंचायतीकडून २० हजार रुपयांची मागणी करण्यात आली.

एसएसईबीत कामाला असलेले मुस्कानचे वडील आनंद बागडे हे कंजारभाट जातीतले आहेत. पण २० वर्षांपूर्वी त्यांनी परजातीतल्या महिलेशी लग्न केलं. त्यामुळं जात पंचायतीनं त्यांना बहिष्कृत केलं होतं. 

आता त्यांची मुलगी मुस्कान ऊर्फ मानसी हिचं कंजारभाट जातीतल्याच तरुणाशीच लग्न ठरलं होतं. मात्र लग्नाआधी जातीत घेण्यास पंचायतीने नकार दिल्याने मुस्कानने आत्महत्या केली. आणखी धक्कादायक बाब म्हणजे मुस्कानच्या मृतदेहावर कंजारभाट जात पंचायतीच्या रीती रिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यासाठी रोख २० हजार रुपये दंड उकळण्यात आले. या घटनेमुळं माणुसकीला काळीमा फासला गेलाय.

जात निर्मूलन सदस्यांनी पुढाकार घेतल्याने हे प्रकरण पुढे आलं आहे. यापूर्वी नाशिक संगमनेरमध्येही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांकडून या प्रकरणी शासनाने लक्ष घालण्याची मागणी करण्यात येत आहे.