खान्देशचा स्वाद जगात भारी : खापरावरच्या पुरणपोळीला लवकरच जीआय मानांकन

पुरणपोळीची पाककृती पाहणं देखील तितकंच सुखद असतं. 

Updated: Jan 25, 2021, 08:50 PM IST
खान्देशचा स्वाद जगात भारी : खापरावरच्या पुरणपोळीला लवकरच जीआय मानांकन title=

योगेश खरे, झी २४ तास, जळगाव : खान्देशच्या खाद्य संस्कृतीचं प्रमुख् वैशिष्ट्य म्हणजे खापरावरची पुरणपोळी...अवघ्या महाराष्ट्रानं या खापरावरच्या पुरणपोळीचा आस्वाद घेतला. पण आता या पुरणपोळीचा डंका जगभरात गाजणाराय.खान्देश म्हणजे तापीकाठ. खान्देश म्हणजे चवदार खाद्य संस्कृती..खान्देश म्हणजे चविष्ट भरताची वांगी, कळण्याची भाकरी आणि खापरावरची पुरणपोळी... अवघ्या महाराष्ट्राच्या जिभेवर खान्देशचे मांडे म्हणजे खापरावरच्या पुरणपोळीची चव रेंगाळतेच... पण सणासुदीला केल्या जाणाऱ्या या पुरणपोळीची पाककृती पाहणं देखील तितकंच सुखद असतं. 

हातावर तयार केलेली मोठाली पुरणपोळी. ती सहजपणे तव्यावर टाकणं हे कौशल्याचं काम असतं. या पुरणपोळीचा गोडवा जगभरात पोहोचावा, यासाठी आता जागतिक मानांकन म्हणजेच जीआय इंडेक्स मिळवण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू झालेत.

केवळ खापरावरची पुरणपोळी नाही, तर जळगावची भरताची वांगी, मेहरूनची बोरं आणि आळूची पानं सुद्धा जागतिक बाजारपेठेत पोहोचणारयत.. यामुळं जळगावचं नाव सातासमुद्रापार पोहोचणाराय.

ग्लोबल इंडेक्स म्हणजेच जी आय टॅगिंग मिळाल्यास जळगावबाहेरील कुणीही हे खाद्यपदार्थ आपले असल्याचा दावा करू शकणार नाही. महत्त्वाचं म्हणजे जागतिक बाजारपेठेत या खाद्यपदार्थांना प्रीमियम भाव मिळेल. महिलांना घरच्या घरी रोजगार मिळेल आणि खान्देशची आणखी भरभराट होईल.