उस्मानाबादच्या तेरमध्ये सापडली २ हजार वर्ष जुनी तांदुळ-मूग डाळीची खिचडी

तुमच्या आमच्या नेहमीच्या आहारात तांदुळ-मूग डाळीची खिचडी नित्याचीच असते. 

Updated: Sep 3, 2018, 07:23 PM IST
उस्मानाबादच्या तेरमध्ये सापडली २ हजार वर्ष जुनी तांदुळ-मूग डाळीची खिचडी title=

उस्मानाबाद : तुमच्या आमच्या नेहमीच्या आहारात तांदुळ-मूग डाळीची खिचडी नित्याचीच असते. कुटुंबापासून लांब राहणाऱ्यांसाठी खिचडी एक सहारा असतो. याच खिचडीचा इतिहास २ हजार वर्ष जुना असल्याचा दावा पुरातत्ववाद्यांनी केला आहे. पुरातत्ववाद्यांना महाराष्ट्राच्या उस्मानाबादमधल्या तेरमध्ये एकत्र शिजवण्यात आलेले तांदुळ आणि मूग मिळाले आहेत. ही खिचडी पहिल्या शतकातली असल्याचा पुरातत्ववाद्यांचा अंदाज आहे. हा परिसर प्राचीन भारताचं एक प्रमुख व्यापारी क्षेत्र होतं. याठिकाणी प्रामुख्यानं रोमसोबत व्यापार व्हायचा.

कशी सापडली खिचडी?

आम्हाला मातीची तुटलेली २ भांडी मिळाली. या भांड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तांदुळ आणि मूग शिजवण्यात आले होते. हे धान्य जळलेलं होतं आणि याचं रुपांतर कार्बनमध्ये झालं आहे, अशी माहिती सोलापूर विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाच्या प्रमुख माया पाटील यांनी सांगितलं आहे.

भारतामध्ये मिरची, बटाटा आणि टॉमेटो काही शतकं पहिलेच आला. यामुळे खिचडीचा स्वाद वाढला असेल. खिचडी शिजवण्याची पद्धत बदलली असली तरी तांदुळ आणि मूग आधीपासूनच खिचडीमध्ये वापरले जात होते.

महाराष्ट्रातला हा भाग सध्या दुष्काळग्रस्त आहे. त्यामुळे आता इकडे भाताची लागवड करणं अशक्य आहे. पण तांदुळ सापडल्यामुळे त्या काळामध्ये या भागात भाताची शेती व्हायची आणि तेवढा पाऊसही उस्मानाबादमध्ये व्हायचा. म्हणूनच तेव्हा लोकांच्या जेवणात भाताला महत्त्वाचं स्थान होतं. महाराष्ट्रामध्ये हडप्पाच्या अनेक साईट्सवर तांदुळाचे अवशेष मिळाले आहेत. पण तांदुळ आणि मूग एकत्र मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुरातत्व विभागाला याचबरोबर गहू, ज्वारी, बाजरी आणि तुरीची डाळही मिळाली आहे.

प्राचीन काळात इथले लोकं शाकाहारी आणि मांसहारीही होते. कारण मानवी वस्त्यांमध्ये मासे, बकरी आणि मेंढ्यांची हाडं आणि अवशेष सापडल्याचं माया पाटील म्हणाल्या.