'ज्याचा बाप आहे द ग्रेट उद्धव ठाकरे'... आदित्य ठाकरे यांच्यासाठी किरण मानेंची खास पोस्ट

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली. किरण माने यांनी देखील खास पोस्ट शेअर केली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jun 13, 2024, 09:40 PM IST
'ज्याचा बाप आहे द ग्रेट उद्धव ठाकरे'... आदित्य ठाकरे यांच्यासाठी किरण मानेंची खास पोस्ट  title=

Aditya Thackeray Birthday : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने (Kiran Mane) यांनी  आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोशल मिडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचे तोंडभरुन कौतुक केले आहे. आदित्य ठाकरे यांचे कौतुक करताना किरण माने यांनी विरोधकांवर शाब्दिक बाण सोडले आहेत. 

किरण माने यांची पोस्ट जशीच्या तशी... 

काळानुसार जगण्याची पद्धत बदलत जाते. भवतालातली परिस्थिती बदलत जाते. माणसाचं वागणं-बोलणं बदलत जातं. आज्जा जसा बोलत होता, वागत होता तसं तंतोतंत आपला बाप नसतो... आणि आपण बापासारखे वागणारे-बोलणारे नसतो. जुन्यातलं नेमकं काय घ्यायचं, काय टाकायचं...आणि घेतलेलं नव्याशी कसं जोडायचं हे ज्याला कळलं तो घराण्याचं नांव काढतो !

ज्यांचे बापजादे महान, कर्तृत्त्ववान होऊन गेलेत त्यांच्यावर तर जबाबदारीचं प्रचंड मोठं ओझं असतं. कारण समाजाच्या त्यांच्याकडून खुप अपेक्षा असतात. लोक त्यांच्यात महामानव ठरलेल्या त्याच्या पुर्वजाला बघतात. म्हणून त्या अपेक्षा बर्‍याचदा फोल ठरतात. पण लाखात एखादा असा हिरा असतो, जो आपल्या थोर पुर्वजांचं नांव आणखी ऊंच तर करतोच, पण स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवण्याची क्षमता बाळगतो.  असाच एक लखलखता सुर्य महाराष्ट्राकडे आहे, ज्याचं नांव आहे आदित्य ठाकरे !
...ज्याचे पणजोबा होते साक्षात प्रबोधनकार ठाकरे. प्रबोधनकार म्हणजे वर्चस्ववादी भिक्षुक्यांचा कर्दनकाळ... प्रतिगामी किड जाळणारा पुरोगामी विचारांचा जाळ... बहुजनांना प्रकाशवाट दाखवणारी धगधगती मशाल ! ...ज्याचे आजोबा होते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. मुंबईतल्या मराठी माणसांचा तारणहार... सिनेनाट्य कलाकारांचा आधार... तमाम हिंदुंच्या काळजातलं भगवं शिवार !
आणि ज्याचा बाप आहे द ग्रेट उद्धव ठाकरे. जणू वर्चस्ववाद्यांनी प्रबोधनकारांचा बदला घेण्यासाठी की काय, पण या नातवाला एकाकी खिंडीत गाठला. ज्याला संपवण्यासाठी जबरदस्त सापळा रचला. पण हा ठाकरी वाघ त्या हिंस्त्र लांडग्यांच्या झुंडीला भिडला, नडला, एकेकाला फाडून पुरून उरला !

अशी थोर परंपरा लाभलेला हा पोरगा. 'आदित्य' हे नांव सार्थ ठरवत दुश्मनांनी रचलेली बदनामीची सगळी कारस्थानं भेदून तेजानं लखलखत वर आलाय. वरवर कोवळ्या दिसणार्‍या या मुलात तिन पिढ्यांचा सगळा अर्क तर आहेच, पण भवतालाचं सखोल भान असलेलं स्वत:चं म्हणून एक संवेदनशील, भक्कम व्यक्तीमत्त्व आहे !

आदित्यजी, तुम्ही महाराष्ट्र पिंजून सगळे नवे-जुने शिवसैनिक शिवबंधनाच्या अनमोल धाग्यात बांधलेत... आता आम्ही एकजुटीनं तुमच्या सोबत आहोत. शिवसेनेच्या घातक्यांना आता निष्ठेची खरी ताकद दाखवूया. समाजातही आणि राजकारणातही विषारी तण माजलंय... सगळी ताकद लावून ते उपटून फेकून देऊया. या महाराष्ट्रातल्या राजकीय आणि सामाजिक वातावरणाला शुद्ध बनवू या, सुंदर बनवुया.

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा, आदित्यजी. जय महाराष्ट्र. 

- किरण माने.