कोल्हापूर वृक्ष लागवड घोटाळा : कर्मचारी निलंबीत, अधिकारी मोकाटच

या प्रकरणी कोल्हापूर वनविभागातील चार कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं. पण, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील भ्रष्टाचारी वनाधिकारी अद्यापही मोकाटच असल्याचे चित्र आहे

Updated: Dec 23, 2017, 10:51 AM IST
कोल्हापूर वृक्ष लागवड घोटाळा : कर्मचारी निलंबीत, अधिकारी मोकाटच title=

कोल्हापूर : राज्यातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा वनविभागामध्ये 4 कोटी वृक्ष लागवडीमधे मोठा भ्रष्टाचार झाल्याची बातमी 'झी मिडीया'नं पुराव्यानिशी दाखवली. त्यानंतर कोल्हापूरचे मुख्यवनसंरक्षक आरवींद पाटील यांनी या संदर्भात कोल्हापूर वनविभागातील चार कर्मचाऱ्याचं निलंबन केलं. पण सातारा आणि सांगली जिल्ह्यातील भ्रष्टाचारी वनाधिकारी अद्यापही मोकाटच असल्याचे चित्र आहे. या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर प्रशासन कोणतेही कारवाई करताना दिसत नाहीए.

मुख्यवनसंरक्षक अरविंद पाटील हे या प्रकरणी सातारा आणि सांगली वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत का ? असा प्रश्न आता उपस्थित होवू लागला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियानाचे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांनी, कोल्हापूरचे मुख्यवनसंरक्षक अरविंद पाटील यांना 21 आक्टोंबर 2017 रोजी पत्र पाठविलं होतं. त्या पत्रामध्ये  कोल्हापूर जिल्ह्यातील तमदलगे इथं झालेल्या जलयुक्त  शिवार योजनेच्या कामात जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी यांनी निकृष्ठ पद्धतीच काम करुन निधीचा अपहार केल्याचा ठपका ठेवला आहे. त्याचबरोबर मुख्य वनसंरक्षकांना जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई करुन, तसा अहवाल सादर करावा असं म्हटल आहे. याला आता दोन महिने पुर्ण झाले, तरी देखील, मुख्य वनसंरक्षक आरंवींद पाटील हे या संदर्भात कारवाई करायला तयार नाहीत.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य काम करुन निधीचा अपहार केल्याचा अहवाल प्राप्त झाला असताना,  मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील हे जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यावर कारावाई का करत नाहीत हा प्रश्न आहे.. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात पत्र व्यवहार करुन देखील जर कारवाई करत नसतील, तर मग सांगली आणि सातारा वनविभागाच्या  अधिकारी आणि कर्मचारी यांना वृक्ष लागवड घोटाळ्यात पाठीशी घालण्याचं काम करत नसतील कशावरुन असा प्रश्न झी मिडीयानं उपस्थित केला आहे.

दरम्यान मुख्यवनसंरक्षक अरविंद पाटील यांनी, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात झालेल्या वृक्षारोपनासाठी वापरेलं मॉडेल तात्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी मंजुर केल्याचं म्हटल होतं. या संदर्भात जयंत पाटील यांना विचारलं असता, त्यांनी मात्र आपण सांगली जिल्ह्याच्या ठरावीक ठिकाणासाठी 1 बाय 1 बाय 1 चे खड्डे खोदण्यास अधिकाऱ्यांना सांगीतल्याचं म्हटलय.. जर हा निकष फक्त सांगलीच्या काही ठिकाणापुरता मार्यादीत होता, तर 1 बाय 1 बाय 1 चे मॉडेल सरसकट का वापरलं आणि सरसकट खड्डे खुदाईसाठी 920 चा दर कुठुन लावला असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थीत होतो आहे.