सेल्फीचा नाद नडला! आंबोलीत पती, मुलादेखत महिला नदीत पडली

पर्यटनासाठी आलेली ही महिला नदीकिनारी सेल्फी घेत होती आणि अचानक तिचा तोल गेला

Updated: Jul 4, 2022, 08:37 PM IST
सेल्फीचा नाद नडला! आंबोलीत पती, मुलादेखत महिला नदीत पडली title=

Konkan Rain : कोकणातला आंबोलीचा धबधबा हा निसर्गप्रेमींना कायम खुणावत असतो. पावसाळ्यात पर्यटक दरवर्षी इथं गर्दी करतात. राज्यातील कानाकोपऱ्यातून लोकं पर्यटनासाठी आंबोलीत येतात. आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे पर्यटकांची पावलं धबधब्याकडे वळू लागलीत.कोरोनामुळे गेली दोन वर्ष पर्यटकांना याठिकाणी येता आलं नाही. यंदा मात्र पावसाला सुरुवात होताच पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

पण काही अतिउत्साही लोकांमुळे अनेकवेळा संकटांना सामोरं जावं लागतं. विशेषत: सेल्फी काढण्याच्या नादात अनेक अपघात होतात. अशीच एक घटना आंबोलीत घडली आहे. सेल्फीच्या नादात एक महिला तोल जाऊन नदीत कोसळली. यावेळी जीवावर उदार होऊन एका पोलिसाने त्या महिलेचे प्राण वाचवले.

नेमकी घटना काय?
आंबोली इथं कणकवलीवरून  पर्यटनासाठी आलेल्या जानवी शिंदे ही महिला हिरण्यकेशी नदी किनारी सेल्फी घेत असताना तोल जाऊन नदीत पडली. त्यांना वाहत जाताना पाहून त्यांच्या मुलाने आणि नवऱ्याने आरडाओरडा केला. अंदाजे 200 मीटर वाहत गेल्यानंतर जानवी यांना नदीतील एक झुडूप हाताला लागलं.

त्या झुडपाला धरून जानवी यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला .तोपर्यंत रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं होतं. पण त्याआधीच परिस्थितीचा अंदाज घेऊन आंबोली पोलीस स्थानकाचे हवालदार दत्ता देसाई यांनी जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेतली. दत्ता देसाई यांनी त्या महिलेला दोरखंडाच्या साहाय्याने नदीकिनारी आणलं. पोटात पाणी गेल्यामुळे आणि घाबरल्यामुळे महिलेला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. 

पोलीस हवालदार दत्ता देसाई यांनी दाखविलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे.