परतीच्या पावसाचा तडाखा, राज्यात आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे.  

Updated: Oct 17, 2020, 08:02 AM IST
परतीच्या पावसाचा तडाखा, राज्यात आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. राज्यात आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू झालाय. पश्चिम महाराष्टारातील २८ जण तर मराठवाड्यातील १६ जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे मराठवड्यातील शेतीचे सगळ्यात जास्त नुकसान मराठवाड्यातील ४ लाख ९९ हजार ६४८ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात राज्यातली ५७ हजार ३५४ हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली आहे. मुसळधार पाऊस आणि विविध नद्यांना आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका हा सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर या शहरांना बसला आहे.

पुणे । शेकडो हेक्टर जमिनीवरची पिके मातीमोल

पुणे जिल्ह्याला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. बागायती शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसलाय. पुणे जिल्ह्यातल्या बागायती पट्यातलं नुकसान कोट्यवधीच्या घरात आहे. वाहून गेलेले कांदा. सडलेला बटाटा, टोमॅटोचा झालेला लाल चिखल आणि भुईसपाट झालेला ऊस. सुजलाम सुफलाम असलेल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, खेड आणि जुन्नर परिसरातील प्रत्येक शेतात कमी अधिक फरकानं हेच चित्रं दिसत आहे. परतीच्या पावसाने शेकडो हेक्टर जमिनीवरच्या पिकं मातीमोल केली आहेत. 

रायगड । हाती आलेले भातपिक पार भूईसपाट

रायगडचा शेतकरी निसर्ग चक्रीवादळातून सावरत असतानाच परतीच्या पावसानं घात केला. हातचं भातपिक पार भूईसपाट झालंय. राय़गड जिल्ह्यातल्या शेकडो शेतकऱ्यांप्रमाणं अर्जून सत्वे यांचेही हाल सुरू आहेत. त्यांची पत्नी उरलंसुरलं भातपिक घरी आणून वाळवते. फुल न फुलाची पाकळी हाती राहिल अशी भाबडी आशा तिला आहे.

 रायगड । भातशेतीचे मोठे नुकसान

रत्नागिरीत भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर मासेमारी पूर्णत: बंद आहे. वादळामुळे नौका बंदरात उभ्या करण्यात आल्या आहेत. मुंबई तसेच गुजरात राज्यातील अनेक नौका या रत्नागिरी जिल्ह्यातील ठिकठिकणच्या बंदरात उभ्या करण्यात आल्या आहे. त्यामुळे मासेमारी व्यवसायावर मोठा परिणाम दिसून येत आहे. कोकणातली भात शेती पाण्याखाली आहे. ४० टक्के पिकांच पावसामुळे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पाण्यात भिजत असलेलं, कापलेलं भातही शेतकरी उचलतोय. ज्या भात  शेतीवर कोकणाचं अर्थकारण वर्षभर चालतं तेच पीक आता पावसामुळे जमीनदोस्त झाले आहे.

वर्धा । संत्रा उत्पादक फळ गळतीमुळे हैराण 

वर्धा जिल्ह्यातल्या संत्रा उत्पादक फळ गळतीमुळे हैराण आहे. त्यातच संत्र्याला बाजार शोधताना त्याची दमछाक होतेय. कारंजात एकच प्रोसेसिंग युनिट आहे. तिथे नंबर लावताना होणारा त्रास त्याहून भयंकर. भरीसभर पाऊसही दगा देतो. एकएक संकट पार करताना संत्रा उत्पादक हैराण झाला आहे.

मराठवाडा । परतीच्या पावसाने दाणादाण

मराठवाड्यात परतीच्या पावसाने दाणादाण उडवलीय. पैठणच्या थेरगावचं चित्र अत्यंत दुर्दैवी आहे. शेतकऱ्यानं कष्टानं उभी केलेली पपईची बाग भूईसपाट झालीय. गेल्या काही दिवसांपासूनचा पाऊस आणि  परतीच्या पावसानंही दाणादाण उडवलीय. तर बाजरीचं पिकही काळवंडलंय. आता सरकारच्या मदतीकडे लक्ष लागलंय. पण मदत मिळेल तरी किती हाही प्रश्नच आहे.

केंद्राचा महाराष्ट्राला दिलासा

दरम्यान, महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वोतोपरी मदत करेल अशी ग्वाहीही पंतप्रधानांनी दिली. बचावकार्यात आणि मदतकार्यात मोदी राज्य सरकारला हवी ती मदत करतील असेही मोदी म्हणाले.