लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे एका शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. सोमेश्वर पाटील असे या शेतकऱ्याचे नाव असून तो उदगीर तालुक्यातील तादलापूर येथील रहिवासी आहे.. उदगीर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिबक सिंचनचे अनुदान न मिळाल्यामुळे सोमेश्वर पाटील या शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून घेतले. विशेषबाब म्हणजे हा सर्व प्रकार तालुका कृषी अधिकारी सिद्धेश्वर मोकळे यांच्या दालनात त्यांच्या समक्ष झाला घडला..०७ जून रोजी एका निवेदनाद्वारे शेतकरी सोमेश्वर पाटील यांनी आपले ठिबक अनुदान येत्या ०८ दिवसात जमा न झाल्यास आत्मदहनाचा ईशारा दिला होता. मात्र त्यांच्या या इशाऱ्याकडे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने दुर्लक्ष केले. त्यामुळे सोमेश्वर पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी सिद्धेवर मोकळे यांच्या दालनात अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला.
गेल्या अनेक महिन्यापासून ठिबक सिंचनाचे अनुदान मिळावे म्हणून सोमेश्वर पाटील हे कृषी अधिकारी कार्यालयाचे खेटे घालत होते. मात्र ठिबकचे अनुदान जमा न झाल्यामुळे आत्मदहन करण्याचा प्रयत्न करीत टोकाचे पाऊल शेतकरी सोमेश्वर पाटील यांनी उचलले. दरम्यान सोमेश्वर पाटील यांनी आत्मदहनाचा ईशारा देऊनही त्यांच्या इशाऱ्याकडे का दुर्लक्ष केले गेले असा मोठा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.