दुर्देवी! एकीला वाचवायला चौघी गेल्या, मुलीला वाचवताना 4 महिला बुडाल्या

कपडे धुताना एक मुलगी पाण्यात पडली, तिला वाचवण्यासाठी चार जणींनी पाण्यात उड्या मारल्या पण...   

Updated: May 14, 2022, 03:37 PM IST
दुर्देवी! एकीला वाचवायला चौघी गेल्या, मुलीला वाचवताना 4 महिला बुडाल्या title=
प्रतिकात्मक फोटो

लातुर : कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या पाच महिलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना लातूरमध्ये समोर आली आहे. मृत महिला या परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील आहेत.

नेमकी घटना काय?
तलावावर कपडे धुताना अचानक एक मुलगी पाण्यात पडली. त्यावेळी इथे असणाऱ्या दोन मुली आणि दोन महिलांनी बुडणाऱ्या मुलीला वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली. पण दुर्देवाने या पाचही जणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अहमदपूर तालुक्यातील तुळशीराम तांडा इथे ही घटना घडली आहे.

मृतांमध्ये राधाबाई धोंडिबा आडे (45), दिक्षा धोंडिबा आडे (20), काजल धोंडिबा आडे (1, सर्वजण रा. रामापूरतांडा, ता. पालम, जि. परभणी), सुषमा संजय राठोड (21), अरुणा गंगाधर राठोड (25, दोघेही रा. मोजमाबाद तांडा, ता. पालम, जि. परभणी) यांचा समावेश आहे.

ऊस तोडणीच्या कामासाठी परभणी जिल्ह्यातील ऊसतोड टोळी पाच महिन्यांपासून अहमदपूर तालुक्यात आहे. येत्या दोन दिवसांत साखर कारखाना बंद होणार असल्याने ऊसतोड महिला शनिवारी सकाळी तुळशीराम तांडा येथील तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुवत असताना अचानकपणे एक मुलगी बुडत असल्याचे दिसू लागल्याने एकापाठोपाठ एकजण अशा चौघींनी वाचविण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र, पोहता येत नसल्याने या पाच जणीही बुडाल्याने मृत्यू झाला.

आपल्या कुटुंबातील नातेवाईक बुडत असल्याने जवळच असलेल्या 10 वर्षीय मुलाने पाहिले आणि त्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तेव्हा गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेऊन त्यांना पाण्याबाहेर काढून वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच त्या पाच जणींचा मृत्यू झाल्याचे किनगाव पोलिसांनी सांगितलं.