शिक्षकाची आदिवासी विद्यार्थ्याला पाईप, लोखंडी रॉड, लाथा-बुक्क्यांनी मारहाण

अनिश रंगराव रिठे पाचवीच्या आदिवासी विद्यार्थ्याला मारहाण 

Updated: Feb 27, 2020, 08:47 AM IST
शिक्षकाची आदिवासी विद्यार्थ्याला पाईप, लोखंडी रॉड, लाथा-बुक्क्यांनी मारहाण

लातूर : शिक्षणाचा आदर्श 'लातूर पॅटर्न' देणाऱ्या लातूरमध्ये शिक्षकाने विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कयादायक प्रकार उघडकीस आलाय. लातूरचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या जेसीपीएम संस्थेच्या वतीने एमआयडीसी परिसरात स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कुल आहे. या शाळेतील अनिश रंगराव रिठे पाचवीच्या आदिवासी विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली आहे. 

मूळचा हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातील पिंपळदरी इथला हा आदिवासी विद्यार्थी आहे. लातूरच्या जेसीपीम संस्थेअंतर्गत चालणाऱ्या आदिवासी वसतिगृहात तो विद्यार्थी राहतो. वसतिगृहाचे अधीक्षक बिराजदार, एक वसतिगृह अधीक्षक तसेच इतर चार शिक्षकांनी मिळून पाईप, लोखंडी रॉडने तसेच लाथा-बुक्क्यांनी एका खोलीत डांबून मारहाण केल्याचा आरोप स्वतः अनिश रिठे या विद्यार्थ्याने केलाय. या अमानुष मारहाणीमुळे अनिशच्या पाठीचं अक्षरशः धिरडं झालंय. 

अनिशने काही तरी चूक केल्यामुळे ही मारहाण करण्यात आली. इतक्या क्रूरपणे मारहाण केल्यानंतर कसल्याही प्रकारचे औषोधोपचारही विद्यार्थ्यावर त्या निर्दयी शिक्षकांनी केले नाहीत असा आरोप पालक रंगराव रिठे यांनी केलाय. घटनेच्या दोन दिवसानंतर अनिशच्या वडिलांना हा सर्व धक्कादायक प्रकार समजला. विशेष बाब म्हणजे ही संस्था लातूरचे माजी आमदार आणि भाजप नेते शिवाजीराव पाटील कव्हेकर यांची आहे. 

घटनेला उलटून अनेक दिवस झाले तरी जेसीपीएम संस्थेचे प्रमुख असलेल्या माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांनी किंवा शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्या दोषी शिक्षक-वसतिगृह अधीक्षकांची साधी चौकशी किंवा कुठलीही कारवाई का केली नाही असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. 

'लातूर पॅटर्न' देणाऱ्या लातूरमध्ये विद्यार्थ्याला क्रूर पद्धतीने मारहाणीच्या प्रकारामुळे शिक्षकाने स्वत:च शैक्षणिक क्षेत्राला काळिमा फासला आहे. याप्रकरणी शाळेतर्फे तसेच संस्थेची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. तसेच पोलिसांतही कसल्याही प्रकारचा गुन्हा किंवा तक्रार पालक रंगराव रिठे किंवा संबंधित संस्थेतर्फे नोंदविण्यात आली नाही. 

माझ्या मुलाने चूक केली, काही तरी बोलला म्हणून मारलं. लहान मुलगा बोलला असेल इतकं मारणे चुकीचे आहे. त्याला भरपूर मारलं. रॉड, चापट-बुक्क्यांनी मारलं. मुलाची मानसिकता इतकी बिघडली की त्याची शिकायची इच्छा नाही. चूक झाली आता पुढे मारणार नाही असं शिक्षक म्हणतात. चूक झाली तर सांगायला हवं होत, मारायची गरज नव्हती असे रिठे यांनी सांगितले.