मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याची 2 महिन्यातच डेंजर अवस्था; ठाकरे गट आक्रमक

कशेडी बोगद्यातली गळती वाढली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. सिमेंटच्या फेसिंगमधून पाण्याचे फवारे उडत आहेत.

वनिता कांबळे | Updated: Jun 24, 2024, 05:02 PM IST
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याची 2 महिन्यातच डेंजर अवस्था; ठाकरे गट आक्रमक title=

Mumbai Goa Highway Kashedi Ghat Tunnel : मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याची 2 महिन्यातच दुरावस्था झाली आहे. कशेडी घाटातील बोगद्याला गळती लागली आहे. बोगद्यात पाणी गळत असल्याने वाहनचालकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कशेडी घाटातील बोगद्यात सर्वत्र पाणी गळत असल्याने मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याविरोधात  ठाकरे गट आक्रमक झाला आहे. 

रत्नागिरीतील  खेडमधील कशेडी बोगद्यातली गळती वाढली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. सिमेंटच्या फेसिंगमधून पाण्याचे फवारे उडत आहेत. त्यामुळे कशेडी बोगद्यातून प्रवास करताना पावसाचा अनुभव येतो. यामुळे वाहन चालकांमध्ये नाराजी आहे. या प्रकरणी राष्ट्रीय महामार्गाच्या तज्ज्ञांकडून पाहणी केली जाणार आहे. 2 किलोमीटर लांबीचा कशेडी बोगदा 2 महिन्यापूर्वी वाहतुकीस खुला झालाय. या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठाकरे पक्षानं आंदोलनाचा इशारा दिलाय. 

लोकसभा मतदानासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सुरु करण्यात आला होता कशेडी बोगदा

लोकसभा मतदानासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांसाठी कशेडी बोगद्यातील वाहतूक 1 मे पासून पुन्हा सुरू करण्यात आली. बोगद्यातून दुहेरी वाहतुक सुरू करण्यात आली. मतदानासाठी मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणात येण्याच्या शक्यतेनं हा निर्णय घेण्यात आला होता. वळणावळणाच्या कशेडी घाटातील प्रवासाच्या वेळेत बचत होते.  5 ते 7 मिनिटांत कशेडी घाटाचं अंतर बोगद्यावाटे कापता येते. 

मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना प्रवासी वाहन चालकांना रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतोय. महामार्गावर पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी नाले व्यवस्था योग्य नसल्याने पावसाच्या पाण्याचे पाट महामार्गावरून नाल्याप्रमाणे वाहातायत. या पाण्यातून मार्ग काढत धोकादायक स्थितीत चालकांना वाहनं चालवावी लागतायत. कशेडी घाट रस्त्याच्या उतारावर रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा त्रास सर्वाधिक होतोय.