चार इंच लांबीची जळू तरुणाच्या नाकात महिनाभर ‘लॉकडाऊन’

डॉक्टरांनी शक्कल लढवून केली सुटका  

Updated: Jun 1, 2020, 06:03 PM IST
चार इंच लांबीची जळू तरुणाच्या नाकात महिनाभर ‘लॉकडाऊन’ title=
संग्रहित फोटो

सिंधुदुर्ग : कोरोना लॉकडाऊनमुळे सगळेजण घरातच अडकले आहेत. पण एक जळू तब्बल महिनाभर एका तरुणाच्या नाकात अडकली होती. तब्बल २५ दिवसांनी तरुणाच्या लक्षात आलं की त्याच्या नाकात काहीतरी अडकलं आहे. नाकात जळू असल्याचं लक्षात आल्यानंतर ती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण जळूनेही सर्वांच्या नाकीनऊ आणले. अखेर डॉक्टरांनी वेगळी शक्कल लढवून जळूला बाहेर काढले.

ही घटना आहे कणकवली तालुक्यातील डिगवळे गावातील. या गावातील शुभम परब हा विद्यार्थी दहावीची परीक्षा दिल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी नेहमीच घरालगतच्या जंगलात जायचा. एक दिवस जंगलातच पाणवठ्यावर ओंजळीने पाणी पित असताना एक जळू नाकात शिरली. शुभमला आपल्या नाकात जळू शिरली हे जराही जाणवलं नाही.

काही दिवसानंतर म्हणजे जवळजवळ २५ दिवसानंतर त्याच्या नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला. सुरवातीला तो उष्णतेने किंवा इतर कारणाने होत असेल असे घरातील मंडळीना वाटू लागले. मात्र एका रात्री ही जळू नाकातून थोडी बाहेर आली आणि शुभमला आपल्या नाकात काहीतरी असल्याचा भास झाला.

डॉक्टरांना दाखवल्यानंतर शुभमच्या नाकात जळू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जळू नाकातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण उपयोग झाला नाही. अखेर एक दिवस शुभमच डॉक्टरांना म्हणाला की ही जळू रात्री झोपल्यावर थोडी बाहेर येते. मग डॉक्टरांनी वेगळी युक्ती केली. त्यांच्या दवाखान्यातील सर्व लाईट्स, पंखे बंद करुन अंधार केला गेला. या अंधाराबरोबरच शांतता राखण्यात आली. तब्बल ४० मिनिटे वाट पाहिल्यांनतर त्या जळूने शेपटीच्या भागाकडून थोडंसं बाहेर येण्याचा प्रयत्न करताच डॉक्टरनी लागलीच चिमटयाच्या साहाय्याने पकडून त्या जळूला बाहेर काढलं. नाकात  तब्बल एक महिन्याचा लॉकडाऊन पूर्ण करुन कोणतीही इजा न करता ही जळू बाहेर आली. बाहेर सरकणारी ती जळू ३ ते ४  इंच लांब होती. पण ओढून काढताना तिची लांबी ७ ते ८ इंच झाली होती, अशी माहिती डॉक्टर पराग मुंडले यांनी दिली.

डॉक्टर पराग मुंडले यांनी शक्कल लढवून त्या युवकाची मोठ्या संकटातून सुटका केली. ती जळू घशात किंवा वरच्या पोकळीत (frontal cavity) सरकली असती तर बाका प्रसंग ओढवला असता. त्या जळूने निपचित पडून महिनाभर युवकाच्या नाकात वास्त्यव्य केले. पण पहिले २५ दिवस तर त्याला त्याचा थांगपत्ताच लागला नाही.

जळू गोड्या पाण्यात राहतात. अन्य प्राण्यांच्या शरीरावर जगणारा हा परजीवी प्राणी मानला जातो. तो माणसांच्या पायाला चिकटतो आणि रक्त शोधून घेतो. दूषित रक्त काढण्यासाठी उपचार म्हणून जळूचा उपयोग केला जात असे.