कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात क्षय आणि कुष्ठरुग्ण संयुक्त शोध अभियान

घरोघरी जाऊन होणार तपासणी  

Updated: Nov 30, 2020, 07:29 PM IST
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात क्षय आणि कुष्ठरुग्ण संयुक्त शोध अभियान

मुंबई : कोरोनाकाळात coronavirus राज्यभरात निदानापासून वंचित राहिलेल्या क्षयरुग्ण आणि कुप्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व जिल्हा आणि महानगरपालिका क्षेत्रात "संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध व कुष्ठरुग्ण शोध अभियान" सुरु करण्यात येणार आहे. 

१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत ही मोहिन राबवली जाणार आहे. याअंतर्गत राज्यातील सुमारे ८ कोटी ६६ लाख २५ हजार २३० लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात ग्रामीण भागातील संख्या ६ कोटी ८२ लाख २३ हजार ३९८ एवढी असून जोखीमग्रस्त शहरी लोकसंख्या १ कोटी ८४ लाख एवढी आहे. पालकमंत्री, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, सरपंच यांनी आपल्या कार्यक्षेत्रात ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. 

कुष्ठरुग्ण आणि क्षयरुग्णांच्या लवकर निदानासाठी विविध उपाययोजना सुचविल्या जात आहेत. रोग शास्त्रीय अभ्यासानुसार या दोन्ही आजाराचे रुग्ण निदान तसंच औषधोपचारापासून वंचित राहिल्यास रुग्णाला या रोगांपासून निर्माण होणाऱ्या गुंतागुतीचा सामना तर करावा लागतोच त्याचप्रमाणे त्यांच्या सहवासातील इतर निरोगी लोकांना संसर्गाचा धोका वाढून त्याची साखळी अखंड रहाते. त्यामुळे अशा रुग्णांचा शोध, निदान आणि उपचार करण्याकरिता मंगळवारपासून घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे.

दरम्यान, नुकताच या मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतला. या मोहिमेसाठी जिल्हाधिकारी आणि महापालिकाक्षेत्रात  महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती तर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समन्वय समिती नेमण्यात आली आहे. 

 

पोलिओच्या धर्तीवर नवी मोहीम 

पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर ही मोहिम राबविण्यात येणार असल्याचे, डॉ. व्यास यांनी सांगितले. सर्वेक्षण पथकात दोन सदस्य असतील त्यात आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक यांचा समावेश असणार आहे. ग्रामीण भागातील सर्व घरांचे तर शहरी भागात निवडक भागाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 

रोगाचे निदान झाल्यास.... 

रोगनिदान झाल्यास संपूर्ण मोफत औषधोपचार आरोग्यसंस्थेकडून करण्यात येणार असल्याचे आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले. घरी येणाऱ्या पथकास तपासणीसाठी सहकार्य करून नागरीकांनी मोहिम यशस्वीतेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी केले आहे.