दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता गेल्या काही काळापासून राज्याच लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. देशभरातही परिस्थिती काही वेगळी नाही. यात बऱ्याच काळापासून बहुतांश व्यवहार ठप्प झाले होते. पण, आता मात्र दारूची दुकानं सुरू ठेवण्याबाबत केंद्र सरकारच्या आदेशाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. ऑरेंज आणि ग्रीन झोनमागोमाग रेड झोनमध्येही दारूची दुकानं सोमवारपासून सुरू होत आहेत.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार ही दुकानं सकाळी १० ते सायंकाळी ६ याच निर्धारित वेळेत सुरू ठेवता येणार आहेत. याशिवाय दुकानांसाठी उत्पादन शुल्क विभागाने विविध अटी टाकल्या आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात ही दुकानं सशर्त खुली राहतील.
काय असतील मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसाठीच्या अटी?
*दुकानावर येणार्या नोकराची आणि ग्राहकांचीही थर्मल स्कॅनिंग करावी लागणार.
*ज्यांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणं आहेत अशा ग्राहक, नोकरांना दुकानात प्रवेश देऊ नये.
*दुकान आणि त्या सभोवतालच्या परिसराचं दर दोन तासांनी निर्जंतुकीकरण करावं.
*ग्राहकांसाठी हॅन्ड सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावं.
*सर्व दारूची दुकानं सुरू राहतील.
*शहरी भागात कंन्टेमेंट झोन वगळून इतर भागातील एकल दुकानं सुरू राहतील.
*दुकानासमोर एकावेळी ५ पेक्षा जास्त ग्राहक असता कामा नये.
*प्रत्येक ग्राहकांमध्ये ६ फूटाचे अंतर असलं पाहिजे.
लॉकडाऊनच्या या काळात सर्व व्यवहार ठप्प झालेले असतानाच देशासह राज्याच्या आर्थिक चक्राचा वेग मंदावला होता. याच धर्तीवर दारुदी दुकानं सुरु करुन त्या माध्यमातून कराच्या रुपात येणाऱ्या उत्पन्नामुळे हा ताण कमी होऊ शकतो. त्यामुळे किमान दारुची दुकानं सुरु करण्यात यावीत असा सूर काही नेतेमंडळींनी आळवला होता. इतरही काही स्तरांतून ही मागणी झाली होती. ज्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आल्याचं चित्र समोर येत आहे.