Maharashtra Ganesh Visarjan 2023 LIVE : यथासांग पाहुचार घेतल्यावर पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी गावी निघणार आहे. अख्खा देश गेल्या काही दिवसांमध्ये बाप्पामय झाला आहे. वाजत गाजत बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील गणेश विसर्जनाची प्रत्येक दृष्य आणि पोलीस बंदोबस्तासह वाहतूक व्यवस्थेबद्दल प्रत्येक अपडेट...
28 Sep 2023, 08:25 वाजता
Ganesh Visarjan 2023 Nagpur LIVE : गणेश विसर्जन आणि ईद मिरवणूक एकाच दिवशी होणार असल्यानं शांततेत पार पडण्यासाठी नागपूर जिल्हा प्रशासन पोलिसांकडून तयारी करण्यात आली आहे. ईद साजरी करण्यासाठी 1 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. तर अनंत चतुर्दशीसाठी सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी दुपारी 2 वाजता नंतरची वेळ पोलिसांकडून देण्यात आली आहे. यासोबतच पोलीस 10 ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातूनही नजर ठेवणार आहेत. 4 फुटापेक्षा जास्त उंचीच्या गणपती विसर्जन शहराबाहेर कोराडी येथे करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे.
28 Sep 2023, 08:23 वाजता
Ganesh Visarjan 2023 Nashik LIVE : नाशिक महानगरपालिकेकडून अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशाच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे.आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी महापालिकेने सहाही विभागांत 27 नैसर्गिक व पारंपरिक ठिकाणी व नदी प्रदूषण टाळण्यासाठी तब्बल 57 कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे... सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री उशिरा मूर्ती संकलन होईपर्यंत हे केंद्र सुरू राहणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. गणेशमूर्तीचे नदीपात्रात विसर्जन न करता मनपाच्या गणेश विसर्जन स्थळांवर गणेशमूर्ती आणि निर्माल्य संकलित करण्यात येणार आहे. यासाठी मनपाने शहरातील सर्व सहा विभागांत एकूण 84 नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांची निश्चिती केली आहे. महापालिकेच्यावतीने नाशिकरोड, नाशिक पूर्व, पंचवटी, सिडको, नाशिक पश्चिम, सातपूर अशा एकूण 83 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. यात नैसर्गिक घाट 27 तर 56 कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे...
28 Sep 2023, 08:13 वाजता
Ganpati Visarjan 2023 Pune ganpati Mandal : अखिल मंडई गणपती मंडळ
मंडळाची विसर्जन मिरवणूक भव्य अशा ‘विश्वगुरू’ रथातून निघणार आहे. स्वामी समर्थांची 10 फूट उंचीची मूर्ती रथावर असून, श्री दत्त महाराजांचे त्रिमिती (थ्रीडी) पेंटिंग रथावर साकारले आहे. 30 फूट उंची आणि 15 फूट रुंदी असलेल्या या रथाची लांबी २१ फूट आहे. रथामध्ये हायड्रोलिक तंत्राचा वापर केला आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचे नगारावादन आणि त्यामागे गंधर्व बँड, शिवगर्जना वाद्य पथक, नादब्रह्म ढोल-ताशा पथक ट्रस्ट सहभागी होतील.
28 Sep 2023, 08:13 वाजता
Ganpati Visarjan 2023 Pune ganpati Mandal : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट
यंदा श्री गणाधीश रथामध्ये मंडळाचे गणराय विराजमान होणार असून, आकर्षक विद्युत रोषणाईने रथ उजळून निघणार आहे. भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेशी रथ सुसंगत आहे. रथावर आठ गजस्तंभ असून, भगवान शंकरांच्या आठ गणांच्या मूर्ती आणि हनुमानाच्या दोन मूर्ती आहेत. मिरवणुकीत आरोग्य रथ अग्रभागी असणार आहे. प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-लेझीम पथक, सनई-चौघडा मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मंडळ यंदा दुपारी चार वाजता लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणुकीत सहभागी होणार आहे.
28 Sep 2023, 08:12 वाजता
Ganpati Visarjan 2023 Pune ganpati Mandal : मानाचा पाचवा गणपती - केसरीवाडा गणपती मंडळ
केसरीवाडा गणेश मंडळाचे गणराय रंगीबेरंगी फुलांनी सजविलेल्या पारंपरिक पालखीत विराजमान असतील. मिरवणुकीत बिडवे बंधू यांचे नगारा वादन, शिवमुद्रा ढोल-ताशा पथक, श्रीराम ढोल-ताशा पथक आणि राजमुद्रा ढोल-ताशा पथक सहभागी होणार आहेत. तसेच इतिहास प्रेमी मंडळातर्फे ‘चापेकर बंधूंना प्रेरणा देणारे लोकमान्य टिळक’ हा जिवंत देखावा सादर केला जाणार आहे.
28 Sep 2023, 08:12 वाजता
Ganpati Visarjan 2023 Pune ganpati Mandal : श्रीमंत भाऊ रंगारी सार्वजनिक गणपती मंडळ
मंडळाच्या गणरायाची मिरवणूक पारंपरिक लाकडी रथातून निघणार आहे. यामध्ये समर्थ ढोल-ताशा पथक, रमणबाग ढोल-ताशा पथक आणि श्रीरा
28 Sep 2023, 08:11 वाजता
Ganpati Visarjan 2023 Pune ganpati Mandal : मानाचा तिसरा गणपती - गुरुजी तालीम गणपती मंडळ
मंडळाच्या श्रींची मिरवणूक स्वप्नील आणि सुभाष सरपाले आणि अविनाश जिंदम यांनी तयार केलेल्या ‘जय श्रीराम-रामराज्य’ या फुलांच्या आकर्षक रथातून निघणार आहे. या मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारावादन, गंधर्व ब्रास बँड, फुलगावच्या नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळेचे सैनिक प्रात्यक्षिके व ढोल-ताशा पथक, नादब्रह्म ढोल-ताशा पथक आणि नादब्रह्म ट्रस्ट ढोल-ताशा पथक सहभागी होणार आहेत.
28 Sep 2023, 08:11 वाजता
Ganpati Visarjan 2023 Pune ganpati Mandal : मानाचा चौथा गणपती - तुळशीबाग गणपती मंडळ
विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळ महाकाल रथाची सजावट करणार आहे. रथ 28 फूट उंच असून फुलांनी सजवलेली 12 फूट उंचीची महाकालची पिंड, हे आकर्षण असणार आहे. उंचीला मर्यादा असल्याने मंडळ पहिल्यांदाच ‘हायड्रोलिक’चा वापर करणार आहे. उज्जैन येथील श्री महाकालेश्वराची सवारी ज्याप्रमाणे निघते, त्याप्रमाणे मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी उज्जैनच्या अघोरी महाराज यांचा सहभाग असेल. मिरवणुकीत लोणकर बंधूंचे नगारावादन आणि स्वरूपवर्धनी, गजलक्ष्मी व शिवप्रताप वाद्य पथके सहभागी होणार आहेत.
28 Sep 2023, 08:10 वाजता
Ganpati Visarjan 2023 Pune ganpati Mandal : मानाचा दुसरा गणपती - ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ
सकाळी नऊ वाजता जोगेश्वरी चौकातील उत्सव मांडवात श्रींची मूर्ती चांदीच्या पालखीत विराजमान होईल. 10.30 वाजता टिळक पुतळा या ठिकाणाहून मुख्य विसर्जन मिरवणुकीत मंडळ सहभागी होईल. सतीश आढाव यांचे नगारावादन, पारंपरिक पोशाखातील अश्वारूढ कार्यकर्ते, न्यू गंधर्व ब्रास बँड, समर्थ प्रतिष्ठान, शिवमुद्रा ढोल-ताशा पथक, ताल ढोल-ताशा पथक मिरवणुकीत सहभागी होतील. शिवमुद्रा ढोल-ताशा पथकाने तयार केलेल्या खास शिवराज्याभिषेक रथाचे सादरीकरणही मिरवणुकीत होणार आहे.
28 Sep 2023, 08:09 वाजता
Ganpati Visarjan 2023 Pune ganpati Mandal : दहा दिवस वातावरणात चैतन्य आणलेल्या बाप्पा निरोप देण्याची वेळ आली आहे. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख गणेश मंडळांनी नेहमीप्रमाणे विसर्जन मिरवणुकीचे नियोजन यंदाही मोठ्या थाट्यामाट्यात केलं आहे. मानाचा पहिला गणपती - ग्रामदैवत श्री कसबा गणपती सार्वजनिक मंडळाची मिरवणूक सकाळी 10.30 वाजता सुरु होणार आहे. ही मिरवणूक रमणबाग प्रशाला, रूद्रगर्जना ढोल-ताशा पथक आणि कलावंत ढोल-ताशा पथक ही तीन पथके सहभागी होती. तसंच नगारखाना, प्रभात बँड, कामयानी प्रशाला आणि बँक ऑफ इंडिया या दिंड्यात सहभागी होतील.