Maharashtra Breaking News LIVE: यंदा मनोज जरांगे पाटील घेणार दसरा मेळावा?

Maharashtra Breaking News LIVE: राजकारण, समाजकारणासोबतच महाराष्ट्र आणि देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा अगदी मोजक्या शब्दांमध्ये जाणून घ्या या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून...

Maharashtra Breaking News LIVE: यंदा मनोज जरांगे पाटील घेणार दसरा मेळावा?

29 Sep 2024, 10:03 वाजता

मुंबईतील 36 जागांपैकी 'या' 2 जागा शरद पवार गटाच्या वाट्याला: सूत्र

मुंबईतील 36 जागांपैकी 2 जागा शरद पवार गटाच्या वाट्याला आल्याची सूत्रांची माहिती आहे. या दोन जागा अणुशक्ती नगर आणि घाटकोपर पूर्वच्या आहेत. मुंबईतील 5 जागांसाठी पवार गटाने मागणी केली होती. सध्या या दोन मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याचे समजते.

29 Sep 2024, 09:46 वाजता

मनोज जरांगे पाटील घेणार दसरा मेळावा?

बीडमधील नारायण गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी आज नारायणगडावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील मराठा बांधव आज नारायण गडावर बैठक घेणार आहेत. बैठकीमध्ये दसरा मेळाव्याचं नियोजन आणि तयारीसाठी चर्चा होणार आहे. दुपारी दोन वाजता नारायण गडावर बैठक होणार आहे. दसरा मेळाव्यामधून मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकी अगोदर काय भूमिका असणार हे जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

29 Sep 2024, 09:43 वाजता

डोंबिवलीत 106 टायरच्या ट्रकचा अपघात; कल्याण मार्गावर प्रचंड ट्रॅफिक

डोंबिवली-नाशिक रोडवर कंपनीचे बॉयलर घेऊन जाणारा 106 टायरचा ओडिसी वाहन कल्याण पत्री पूल परिसरात उलटले. डोंबिवलीहून कल्याण येणाऱ्या वाहनाची मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र रविवारी सकाळी पाहायला मिळालं. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तारेवरची कसरत करत वाहने बाजू काढण्याचं काम सुरु केल्यानंतर काही तासांनी वाहतूक सुरळीत करण्यात यश आलं.

29 Sep 2024, 08:36 वाजता

बारावी परीक्षेचे अर्ज 1 ऑक्टोबरपासून

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 1 ते 30 ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन अर्ज करता येतील. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

29 Sep 2024, 08:35 वाजता

म्हाडा लॉटरी; आज हरकती दाखल करता येणार

म्हाडाच्या मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या 2 हजार 30 घरांच्या लॉटरीला अर्जदारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. 1 लाख 34 हजार 350 एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. आता या लॉटरीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. यादी प्रसिद्ध झाल्यापासून 29 सप्टेंबर रोजी दुपारी12 वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाइन दावे-हरकती दाखल करता येणार आहेत. 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. बांधकामाधीन गटामध्ये 1327 घरे, दुसऱ्या गटात बिल्डरकडून म्हाडाला प्राप्त झालेली 370 घरे, तिसऱ्या गटात मागील लॉटरीतील विविध वसाहतीतील विखुरलेल्या 333 घरांचा समावेश आहे. 8 ऑक्टोबर लॉटरीची सोडत काढण्यात येणार आहे.

29 Sep 2024, 08:31 वाजता

महायुतीच्या प्रमुख नेत्यांची 'वर्षा'वर बैठक

महायुतीच्या प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षावरील बैठक दोनतास सुरू होती. बैठकित स्टॅडिंग सीट तसेच तीनही पक्षांनी दावा केलेल्या जागांवर सविस्तर चर्चा केली जात आहे. तीन पक्षाचा दावा असलेल्या जागांवर कुठला उमेदवार उजवा ठरू शकतो, तिथली राजकीय आणि जातिय समिकरणं याचाही विचार केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिंकून येणाऱ्या जागा किती, कुठल्या जागांवर अधिक मेहनत घेणं गरजेचं आहे यावर विचार विनिमय केला जात असल्याचे कळते.

निवडणुकीला सामोरे जाताना कुठल्या मुद्यांवर भर द्यायला हवा, कुठले वादग्रस्त मुद्दे प्रकर्षाने टाळायला हवेत, वचननाम्यात नागरिकांशी निघडीत मुद्यांना प्राधान्य असायला हवेत यावर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. प्रचार आणि सभांची जबाबदारी त्याचबरोबर नियोजन या सर्व गोष्टींवर बैठकित सखोल चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

29 Sep 2024, 08:30 वाजता

बावनकुळे दोन दिवसीय चंद्रपूर दौऱ्यावर

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे दोन दिवसीय चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते चंद्रपूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. उद्या दुपारी 4 वाजता राजुरा येथील सम्राट हॉल येथे राजुरा विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता चंद्रपूर शहरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हॉल येथे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

29 Sep 2024, 08:27 वाजता

आज उद्धव ठाकरे नागपुरमध्ये

उद्धव ठाकरे नागपुरात येणार आहे. हॉटेल रेडिसन येथे थांबून बारा ते पाच दरम्यान पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता ते कळमेश्वरच्या दिशेने रवाना होणार. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण जाहीर सभाही होईल.

29 Sep 2024, 08:27 वाजता

सुशीलकुमार शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम

अकलूज येथे राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सुशीलकुमार शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळेस महाविकास आघाडीतील खासदारांचा सत्कार केला जाणार आहे. हा कार्यक्रम दुपारी 2 वाजता पार पडणार आहे.

29 Sep 2024, 08:25 वाजता

पुणे मेट्रोचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून उद्घाटन

पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोच्या शिवाजी नगर ते सिविल कोर्ट ते स्वारगेट भुयारी मार्गाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार आहे. यावेळी स्वारगेट ते कात्रज मार्गाचे भूमिपूजनही होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे.