Breaking News LIVE Updates: रायगड - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद राहणार

Breaking News LIVE Updates : पाऊस आला आणि न संपणारी भीती देऊन गेला. मुंबईच्या लोकलची काय स्थिती? पाहा राज्यापासून देशापर्यंतच्या सर्व घडामोडी एका क्लिकवर   

Breaking News LIVE Updates: रायगड - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद राहणार

Breaking News LIVE Updates : मंगळवारी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणातू ही बातमी येतेय. मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणात शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलीय. मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय. ठाणे जिल्ह्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शाळा तसंच बारावीपर्यंत कॉलेजेसना सुट्टी देण्यात आलीय.

राज्यात पावसानं बहुतांश भागांना झोडपणं सुरु असतानाच तिथं देशातही चित्र वेगळं नाही. हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पावसानं चिंता वाढवली आहे. तर, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद शमण्याचं नाव घेत नसल्यामुळं देशातील संरक्षण यंत्रणेपुढील आव्हानं वाढताना दिसत आहेत. यासंदर्भातील सर्व घडामोडींचे Live Updates खालीलप्रमाणे... 

9 Jul 2024, 12:14 वाजता

Breaking News LIVE Updates : ...तर नाशिकमधील पर्यटकांवर दाखल होणार गुन्हा 

पावसाळ्यामुळे नाशिक जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळे आणि धरणांवर पर्यटकांचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून चक्क नाशिक जिल्ह्यामध्ये पर्यटन स्थळांवर कलम 163 लागू करण्यात आले आहे. ग्रामीण पोलिसांच्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार एका ठिकाणी पाच पेक्षा अधिक पर्यटक जमल्यास त्यांच्यावर कलम 223 नुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. निसर्गाच्या मनमोहक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी असतानाच अनेक पर्यटक मस्ती करतात. नियम धाब्यावर बसवतात. परिणामी, जीव धोक्यात सापडत असल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्ह्यातील तब्बल ३५ पर्यटन स्थळांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. यामुळे पर्यटनस्थळावर वर्षाविहारासाठी जाताना पर्यटकांना अनेक नियम पाळून खबरदारी घ्यावी लागणार आहे. 

9 Jul 2024, 11:01 वाजता

Breaking News LIVE Updates : आमदार बच्चू कडू महायुतीतुन बाहेर पडण्याची शक्यता

आमदार बच्चू कडू महायुतीतुन बाहेर पडण्याची शक्यता. आगामी विधानसभा निवडणूकीत बच्चू कडू उभी करणार तिसरी आघाडी. बच्चू कडू यांची प्रहार संघटना, संभाजी राजे यांचा स्वराज्य पक्ष, रविकांत तुपकर यांची संघटना व आम आदमी पार्टी एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता. लवकर बच्चू कडू आणि संभाजी राजे एकत्र पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणूकीबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती. राज्यात महायुती व महाविकास आघाडी नंतर लवकरच निर्माण होणार तिसरी आघाडी? या प्रश्नानं डोकं वर काढलं. 

9 Jul 2024, 10:34 वाजता

Breaking News LIVE Updates : मनोज जरांगेंचा भुजबळांवर पुन्हा घणाघात 

मनोज जरांगे यांच्या दौऱ्याचा आज चौथा दिवस आहे असून, आता तिसऱ्या जिल्ह्यात दौरा झाला आहे. राज्यातील मराठा आता मुलांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरलाय. आम्ही आमच्या मुलांच्या न्यायासाठी का रस्त्यावर येऊ नये? असा सवाल त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला. 

यावेळी फडणवीसांना आपण जे समजावून सांगितले आहे त्याचा अर्थ त्यांनी काय काढायचा तो काढावा, असा इशाराच त्यांनी दिला. ते जनतेशी खुणशीने वागतात हे आपण त्यांच्या लक्षात आणून दिल्याचं सांगत त्यांच्यामुळं गरिबांचं वाटोळं होत असल्याचा नाराजीचा सूर त्यांनी आळवला.  फडणवीस भुजबळ यांना बळ देतात हे आता जनतेच्या लक्षत आलं आहे किंबहुना फडणवीस यांनी भुजबळ यांना मंत्रीपद यासाठीच दिलं आहे का? असा थेट प्रश्नच त्यांनी उपस्थित केला. 

9 Jul 2024, 09:41 वाजता

Breaking News LIVE Updates :  पावसाचा बेस्ट विद्युत पुरवठ्यावर परिणाम

पावसाचा बेस्ट विद्युत पुरवठ्यावर परिणाम. मुंबईतल्या परळ,लालबाग,करी रोड परिसरात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित. पावसामुळे भूमिगत केबल मध्ये बिघाड झाल्याने काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी जनरेटर लाऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. बिघाड दुरुस्त करण्यासाठी बेस्ट  पुरवठा अधिकारी ,कर्मचारी काम करत आहेत

9 Jul 2024, 09:30 वाजता

Breaking News LIVE Updates : खाजगी गाडीवर लाल दिवा लावणाऱ्या महिला आयएएस अधिकाऱ्याची बदली

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पूजा खेडकर यांच्या विषयी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्याच्या अप्पर सचिवांकडे तक्रार केली होती. खेडकर यांनी स्वतःच्या ऑडी कार वर लाल तसेच निळा दिवा लावला होता. असं करणं नियमबाह्य असल्याचं दिवसे यांच्या पत्रात म्हटलं आहे. एकच नाही तर पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अँटी चेंबर स्वतःच्या ताब्यात घेतल्याची देखील चर्चा होती. 

9 Jul 2024, 08:42 वाजता

Breaking News LIVE Updates : माझी लाडकी बहीण योजनेच्या जबाबदारीतून तहसिलदारांना मुक्त करण्याची मागणी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जबाबदारीतून तहसिलदारांना मुक्त करण्याची राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेची सरकारकडे मागणी असून, ही मागणी मान्य न झाल्यास राज्यभर योजनेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. तहसीलदारांकडे महसूली कामांसह ईतर कामांचा मोठा व्याप असल्याचं कारण देत ही मागणी करण्यात आली आहे. 

9 Jul 2024, 08:32 वाजता

Breaking News LIVE Updates : वसंत मोरे आज शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात करणार प्रवेश 

वसंत मोरे हे मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार. मागील आठवड्यात त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याचवेळी आपण पक्षात पक्ष प्रवेश करू इच्छितो असं त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं होते. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मातोश्री या ठिकाणी वसंत मोरे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित होणार आहे. वसंत मोरे याआधी मनसे आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडी मध्ये  होते.  लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी महाविकास आघाडीतून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते, मात्र उमेदवारी न मिळाल्याने लोकसभा निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी घेतली होती. 

9 Jul 2024, 08:31 वाजता

Breaking News LIVE Updates : अजित पवार गट आखणार 90 दिवसांचा खास प्लॅन 

आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची (Ajit Pawar NCP) सोमवारी महत्त्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढच्या 90 दिवसात प्लॅन बनवला जाणार असून प्रत्येक आमदाराला विधानसभा निहाय जबाबदारी दिली जाणार आहे. तसेच अजित पवार यांचे ब्रँडिंग केले जाणार असून 'शब्दाला पक्का, अजितदादा' अशा आशयाचे कॅम्पेन राबवले जाणार आहे.

9 Jul 2024, 08:07 वाजता

Breaking News LIVE Updates : मुंबई लोकलची काय स्थिती? 

पावसानं उसंत घेतली असली तरीही मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे सेवा अद्यापही विस्कळीतच आहे. ठाणे आणि त्यापुढं कल्याण दिशेला पावसाचा जोर वाढल असल्यामुळं मध्य रेल्वेवरील लोकल 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावत आहेत. तर, मेल, एक्स्प्रेस गाड्या रखडल्यानं लोकल सेवेवर परिणाम होत आहे. पश्चिम रेल्वेवरील सेवा मात्र सुरळीत असल्याचं सांगण्यात येत आहे. 

 

 

9 Jul 2024, 08:02 वाजता

Breaking News LIVE Updates : पुण्यातही पावसाचा रेड अलर्ट 

पुण्यातही आज पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय. जिल्ह्यातील काही भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. पुणे शहर, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, मावळ, मुळशी आणि भोर तालुक्यातील  १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिलेत. तसंच नागरिकांनाही सावधानता बाळगावी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनंही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं.