Breaking News LIVE Updates : मंगळवारी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणातू ही बातमी येतेय. मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणात शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलीय. मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय. ठाणे जिल्ह्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शाळा तसंच बारावीपर्यंत कॉलेजेसना सुट्टी देण्यात आलीय.
राज्यात पावसानं बहुतांश भागांना झोडपणं सुरु असतानाच तिथं देशातही चित्र वेगळं नाही. हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पावसानं चिंता वाढवली आहे. तर, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद शमण्याचं नाव घेत नसल्यामुळं देशातील संरक्षण यंत्रणेपुढील आव्हानं वाढताना दिसत आहेत. यासंदर्भातील सर्व घडामोडींचे Live Updates खालीलप्रमाणे...
9 Jul 2024, 08:01 वाजता
Breaking News LIVE Updates : मुंबई हळुहळू पूर्वपदावर
मुंबईत पावसाचा जोर ओसरला असला तरीही अद्यापही विस्कीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येऊ शकलेलं नाही. शहरातील बहुतांश भागांमध्ये पावसानं उसंत घेतली आहे. रेल्वेसेवांही पूर्ववत येत आहेत. मुख्य म्हणजे पाऊस नसूनही रेड अलर्टमुळं अनेक मुंबईकर, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गानं घरातच राहण्यास पसंती दिली असल्यामुळं रस्त्यांवरही शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
9 Jul 2024, 07:53 वाजता
Breaking News LIVE Updates : पुढील 24 तासांसाठी पावसाचा अंदाज...
पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यताय. पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यासाठी हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तसंच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय. पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी ही हवामान खात्याचा रेड अलर्ट आहे. सातारा, कोल्हापूर परिसरातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीये.