Maharashtra Weather Updates : सकाळी ऊन, दुपारी ढगांची दाटी अन् रात्री पाऊस; पाहा राज्यातील हवामानाचा नेमका अंदाज

Maharashtra Weather Updates : काय आहे पावसाची स्थिती? आज छत्री उन्हासाठी वापरायची की पावसासाठी? पाहा सविस्तर हवामान वृत्त.   

सायली पाटील | Updated: Sep 16, 2024, 08:46 AM IST
Maharashtra Weather Updates : सकाळी ऊन, दुपारी ढगांची दाटी अन् रात्री पाऊस; पाहा राज्यातील हवामानाचा नेमका अंदाज  title=
Maharashtra Weather News light rainfall predictions for Konkan and central Maharashtra

Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाची निरंतर ये- जा सुरु असल्याचं पाहायला मिळालं आहे. एकिकडे पाऊस काही भागांमध्ये जोर धरताना दिसत आहे, तर काही भागांमध्ये मात्र तो उघडीप देताना दिसत आहे. अशा या पावसानं काहीशी विश्रांती घेण्याचा पर्याय निवडला असून, सध्या त्याच धर्तीवर मुंबईसह उपनगरांमध्ये पाऊस उय़घडीप देताना दिसत आहे. असं असलं तरीही कोकणासह मध्य महाराष्ट्रात मात्र हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र पुन्हा तीव्रतेनं सक्रिय झालं असून, त्यामुळं भारताच्या पूर्वेकडेही पावसाटा जोर वाढला आहे. त्यातच राज्याच्या काही भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. दरम्यान, इथं पाऊस ये- जा करत असतानाच तिथं तापमानाच्या आकड्यांमध्येही सातत्यानं बदल होताना दिसत आहेत. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर 

मागील 24 तासांमध्ये राज्यात कमाल तापमान 34.5 अंशांच्या घरात पोहोचलं आहे. तर किमान तापमानातही वाढ झाली आहे. मुंबईसह रायगड आणि नजीकच्या भागांमध्येही सकाळी ऊन, दुपारी उकाडा अन् रात्री पाऊस असं हवामानाचं चित्र पाहायला मिळत असल्यामुळं अचानकच दाटून येणारे आणि बरसणारे ढग नागरिकांची तारांबळ उडवताना दिसत आहेत. तिथं विदर्भातही बऱ्याच काळानंतर आता पावसानं उसंत दिली असून, काही भागात मात्र पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी असलं तरीही ढगांची दाटी मात्र पाहायला मिळणार आहे. अधूनमधून इथंही पावसाच्या जोरदार सरींची शक्यता नाकारता येत नाही. 

पुढील 15 दिवसांसाठी हवामानाचा अंदाज 

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार देशभरात 19 सप्टेंबरपर्यंत हवामान सामान्य राहणार असून, त्यानंतर मात्र हवामानात काही बदल होणार आहेत. 19 सप्टेंबरनंतर उत्तर पश्चिम भारतामध्ये हळुहळू पावसाचं प्रमाण कमी होणार आहे. 26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरदरम्यान पूर्व भारत वगळता देशाच्या उर्वरित भागांमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळेल. आयएमडीचा अंदाज योग्य ठरल्यास मागील आठ वर्षांमध्ये यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच पाऊस निर्धारित वेळेच्या आधीच परतीच्या वाटेला लागणार आहे.