Maratha Reservation LIVE: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शासनानं निर्णय घेतला नाही तर, आपण बुधवारपासून पाणीही पिणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसीतून आरक्षण द्यावं, शासनानं काहीही करावं पण, आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा. असं न केल्यास आपण पाण्याचा थेंबही घेणार नसून होणाऱ्या परिणामांना शासनच जबाबदार असेल असं ते म्हणाले.
1 Nov 2023, 19:23 वाजता
आरक्षण मिळाल्याशिवाय पाण्याला हात लावणार नाही असा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. पाणी त्याग करत असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली. यामुळे येत्या काळात मनोज जरांगे यांचे आंदोलन आणखी तीव्र होणार आहे.
1 Nov 2023, 15:19 वाजता
Maratha Reservation LIVE: पूर्णा तहसील पेटवून देण्याचा प्रयत्न, अज्ञाताने लावली आग
परभणीचे पूर्णा तहसील आज बारा वाजताच्या सुमारास कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न झालाय. तहसील कार्यालयालाच पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न झालाय. मात्र तिथे असलेल्या अग्निशमन दलाने काही वेळातच आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी घटना टळली.
1 Nov 2023, 15:04 वाजता
Maratha Reservation LIVE: सोलापूर - सोलापुरात मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक, सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळत वाहतूक पाडली बंद. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील पाळे पुलाजवळ टायर जाळत महामार्ग रोखला. कालच्या रेल रोको आंदोलना नंतर आज पुन्हा टायर जाळत सरकारचा निषेध
1 Nov 2023, 13:16 वाजता
Maratha Reservation LIVE: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानाबाहेर सुरक्षा वाढवली
मराठा आरक्षण संदर्भात राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खाजगी निवासस्थानासमोर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. धरमपेठ परिसरातील त्रिकोणी पार्कजवळ देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी निवासस्थान आहे. एरवी फडणवीस नागपुरात असताना त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असतो. मात्र, सध्या उपमुख्यमंत्री फडणवीस नागपुरात नसताना सुद्धा घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
1 Nov 2023, 12:36 वाजता
Maratha Reservation LIVE: मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील गंगावळण या ठिकाणी भीमा नदी पात्रात सकल मराठा समाजाच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात येतयं. एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणा देत मनोज जरांगे पाटील यांना समर्थन दर्शवण्यात येत आहे.
1 Nov 2023, 12:34 वाजता
Maratha Reservation LIVE: सूत्रांच्या माहितीनुसार धाराशिव धाराशिव जिल्ह्यात लागू केलेली संचारबंदी दुपारनंतर उठवली जाणार. जिल्ह्यात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर लागू करण्यात आली होती. पण, आता मात्र ही संचारबंदी उठवली जाण्याची चिन्हं आहेत.
1 Nov 2023, 12:11 वाजता
Maratha Reservation LIVE: मराठा आरक्षणासाठी आंदोलक अजूनही आक्रमक आहेत. सिल्लोड तालुक्यत भराडी गावात आंदोलकांनी अब्दुल सत्तार यांच्या फोटोचे दहन केले आणि जोरदार घोषणाबाजी केली. मंगळवारीसुद्धा अब्दुल सत्तार यांच्या मुलाची गाडी आंदोलकांनी अडवली होती. तसेच सत्तार यांनी विकास कामाचे जे फलक लावले होते ते उखडून टाकले होते.
1 Nov 2023, 12:01 वाजता
Maratha Reservation LIVE: मुंबईत मंत्रालयाबाहेर मराठा आमदारांनी सरकारविरोधी आंदोलन केलं आणि पोलिसांनी इथं येत या आंदोलकांना ताब्यात घेतलं. ज्यानंतर या भागात एकच नाट्य पाहायला मिळालं.
1 Nov 2023, 11:31 वाजता
Maratha Reservation LIVE: रास्तारोको दरम्यान पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या 40 जणांना नांदेड पोलीसांनी अटक केलीये. दगडफेकीत नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हाताला दगड लागून ते जखमी झाले होते. नांदेड हैद्राबाद रोडवर कुष्णुर येथे काल रास्तारोको करण्यात येत होता. या ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती. ज्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
1 Nov 2023, 10:58 वाजता
Maratha Reservation LIVE: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहूत मनोज जरांगे पाटील यांना शांततेच्या मार्गाने पाठिंबा दर्शविण्यासाठी सकल मराठा समाज देहू ग्रामस्थांनी मशाल मोर्चा काढला..छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेला मशाल मोर्चा देहू कमान तसेच संपूर्ण देहू गावात वळसा घालण्यात आला यावेळी एक मराठा लाख मराठा या जयघोषाने देहूनगरी दुमदूमली.